सध्या संपूर्ण देशात करोना व्हायरस मोठ्या प्रमाणावर पसरत असल्याचे दिसत आहे. व्हायरसच्या संसर्ग थांबवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संपूर्ण देशात २१ दिवस लॉकडाउनची घोषणा केली. अशा परिस्थितीमध्ये सर्वजण आपापल्या परिने सहकार्य करण्याचा प्रयत्न करत आहेत. यात कलाकार देखील मागे नाहीत. या सर्वामध्ये नुकताच एका अभिनेत्रीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. ही अभिनेत्री करोना व्हायरसचा संसर्ग झालेल्या रुग्णांची सेवा करताना दिसत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

बॉलिवूड फोटोग्राफर विरल भयानीने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्याने अभिनेत्री शिखा मल्होत्राचा फोटो शेअर केला आहे. शिखाने संजय मिश्रा यांच्यासोबत ‘कांचली’ या चित्रपटात काम केले आहे. ‘शुक्रवारी शिखाने जोगेश्वरीमधील बीएमसीच्या ट्रॉमा हॉस्पिटलमध्ये नर्स म्हणून काम करण्यास सुरुवात केली आहे. शिखाने वर्धमान महावीर मेडीकल कॉलेज आणि दिल्लीमधील सफदरजंग हॉस्पिटलमध्ये २०१४मध्ये नर्सिंगचे शिक्षण घेतले आहे. अभिनयाची आवड असल्यामुळे तिने आजवर नर्सचे काम न करता केवळ अभिनय क्षेत्रात काम केले होते’ असे पोस्टमध्ये म्हटले आहे.

बीएमसीने शिखाला नर्स म्हणून काम करण्यास परवानगी दिली आहे. सध्या ती जोगेश्वरीमधील हिंदूहृदय सम्राट ठाकरे ट्रॉमा हॉस्पिटलमध्ये ड्यूटी करत आहे. विरलच्या पोस्टमध्ये शिखाने तिचे मत मांडले आहे. ‘नर्सिंगचे शिक्षण घेतल्यानंतर आम्ही समाज कल्याणाची शपथ घेतली होती आणि माझ्या मते हिच ती योग्य वेळ आहे’ असे तिने म्हटले आहे.

करोना व्हायरसची लागण झालेल्या देशभरातील रुग्णांची संख्या शनिवारी ९३३ झाली. आतापर्यंत यापैकी २१ जणांचा मृत्यू ओढवला आहे. केरळमध्ये या व्हायरसचा पहिला बळी शनिवारी नोंदविला गेला. गुजरातेत करोनामुळे एका महिलेचा शनिवारी मृत्यू झाला असून गुजरातमधील बळींची संख्या चार झाली आहे. भारतात शनिवारपर्यंत करोनाच्या ९३३ रुग्णांची नोंद झाल्याचे केंद्रीय आरोग्य विभागातर्फे सांगण्यात आले. यापैकी ८३३ रुग्णांवर सध्या विविध रुग्णालयांत उपचार सुरू आहेत, तर ७९ रुग्ण हे पूर्णत: बरे झाल्याने त्यांना रुग्णालयातून घरी पाठविण्यात आले आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Coronavirus lockdown kannchli actress shikha malhotra volunteers as nurse in bmc hospital for covid 19 avb
First published on: 29-03-2020 at 09:30 IST