सध्या संपूर्ण जग कोरोना विषाणूच्या संकटावर मात करण्यासाठी लढत आहे. सगळ्यांच्या दैनंदिन जीवनावर या संकटाचा परिणाम झालेला दिसून येतोय. या विषाणूचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी  सरकार अनेक ठोस निर्णय घेताना दिसत आहे. त्यामुळे देशात २१ दिवसांचा लॉकडाउन करण्यात आलं आहे. याच कारणास्तव याचे पडसाद कलाविश्वावरदेखील उमटले आहेत. ३१ मार्चपर्यंत सर्व मालिका, चित्रपट, नाटक, वेबसीरिज यांचं चित्रीकरण बंद ठेवण्यात आलं आहे. त्यामुळे कलाकार मंडळी घरी असून त्यांचा फावला वेळ छंद जोपासण्यात, घर काम करण्यात घालवत आहेत. विशेष म्हणजे अभिनेता देवदत्त नागे सध्या स्वविलगीकरणात राहत असून त्याने या क्वारंटाइनच्या काळात एक भन्नाट प्लॅन आखल्याचं पाहायला मिळतंय.

‘जय मल्हार’ या मालिकेच्या यशानंतर देवदत्त नागे सध्या ‘डॉक्टर डॉन’ या मालिकेत पाहायला मिळत आहे. कमी कालावधीमध्ये या मालिकेने चांगलीच लोकप्रियता मिळविली आहे. परंतु सध्या करोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे देवदत्त क्वारंटाइनमध्ये असल्याचं दिसून येत आहे. विशेष म्हणजे या काळात कोणकोणती काम करायची याचा एक प्लॅन त्याने आखल्याचं पाहायला मिळत आहे.

देवदत्तला बॉडीबिल्डिंगची आणि बाईक चालविण्याची खूप आवड असल्याचे सगळ्यांनाच ठाऊक आहे. मार्चअखेरपर्यंत मिळालेल्या या सुट्टीमध्ये तो, या दोन्ही गोष्टींकडे अधिक लक्ष देणार असल्याचं समजतंय. शरीर कमावण्याबद्दलची अधिक माहिती, सोशल मीडिया आणि पुस्तकांचा पुरेपूर वापर करून तो मिळवणार आहे. वर्कआऊट संदर्भातील पुस्तके वाचणे, अरनॉल्ड, रॉकसारख्या जगप्रसिद्ध बॉडीबिल्डर्सचे युट्युब व्हिडीओज पाहणे यात तो त्याचा वेळ घालवणार आहे. सूर्यनमस्कारासारखे व्यायामप्रकार तो या दिवसांमध्ये करणार आहे. अर्थात, युट्युबचा वापर तो केवळ या विषयावरील व्हिडीओ बघण्यासाठी करणार नसून, त्या माध्यमातून चित्रीकरण आणि एडिटिंगविषयी अधिक माहिती मिळवण्याचा सुद्धा त्याचा प्रयत्न असणार आहे. बाईक्सची खूप आवड असलेला देवदत्त ट्रॅव्हलवर आधारित युट्युब चॅनेल्स सुद्धा बघणार असल्याचं त्याने सांगितलं आहे.

दरम्यान, केवळ इतकंच नाही तर याशिवाय त्याच्याकडे असलेल्या बाईक्सची काळजी घेण्यासाठी तो वेळ काढणार आहे. तसंच कुटुंबासाठीही त्याने वेळ राखून ठेवला आहे. या दिवसांमध्ये तो कुटुंबीयांसोबत त्याचा वेळ घालवणार आहे. घरच्या कामामध्ये जबाबदारी उचलणे, नव्या पाककृती शिकण्याचा प्रयत्न करणे अशा इतरही अनेक गोष्टी देवदत्त करणार आहे. त्यामुळे या लॉकडाउनमुळे मिळालेल्या फावल्या वेळाचा देवदत्त पुरेपूर फायदा करुन घेणार असल्याचं एकंदरीत दिसून येत आहे.