चीनमधील वुहान शहरातून फैलाव झालेल्या करोना विषाणूने भारतात शिरकाव केला आहे. त्यामुळे या विषाणूचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी २१ दिवस लॉकडाउन करण्याची घोषणा केली आहे. या काळात आत्यावश्यक सुविधा सोडल्या तर सारं काही बंद ठेवण्यात आलं आहे. तसंच नागरिकांनी कामाव्यतिरिक्त घराबाहेर पडू नये असं आवाहनही केलं आहे. मात्र तरीदेखील काही नागरिक या आदेशाचं उल्लंघन करताना दिसतात. त्यामुळेच आता कलाविश्वातील सेलिब्रिटींनी पुढाकार घेत सोशल मीडियाच्या माध्यमातून नागरिकांना घराबाहेर न पडण्याचं आवाहन केलं आहे. यात ‘गाव गाता गजाली’ या मालिकेच्या टीमने भन्नाट शक्कल लढवली आहे.

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका म्हणून ‘गाव गाता गजाली’ या मालिकेकडे पाहिलं जातं. कोकणातील निर्सग, मालवणी भाषा आणि तेथील माणसांमधील गोडवा दाखविणारी ही मालिका कमी कालावधीत लोकप्रिय झाली. त्यामुळे या मालिकेचा प्रेक्षक वर्गही मोठा असल्याचं पाहायला मिळतं. याच कारणास्तव या टीमने नागरिकांना मालवणी भाषेत घरातून बाहेर पडू नका, असं आवाहन केलं आहे.

‘गजाली From Home’ या शीर्षकाखाली मालिकेतील प्रत्येक कलाकाराने नागरिकांना घरात राहण्याचं आवाहन केलं आहे. मालवणी भाषेत त्यांनी गजाली केली असून करोनामुळे सध्या देशात किती भयान परिस्थिती निर्माण झाली आहे हे सांगण्याचा प्रयत्न केला आहे. दरम्यान, या कलाकारांनी स्वत: घरात राहून हा व्हिडीओ केला आहे. मालिकेतील कलाकारांनी हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला असून सध्या तो चांगलाच व्हायरल होत आहे.