करोना विषाणूचा सामना करण्यासाठी केंद्र सरकारने ३ मे पर्यंत लॉकडाउन वाढवलं आहे. या काळात देशातील सर्व वैद्यकीय अधिकारी आणि डॉक्टर आपलं काम करत आहेत. मात्र उत्तर प्रदेशातील मोरारबाद येथे हाजी नेब मशिद भागात तपासणीसाठी गेलेल्या डॉक्टर आणि पोलिसांवर स्थानिक नागरिकांनी दगडफेक केली. या घटनेनंतर सर्व स्तरामधून संताप व्यक्त केला जात असून अभिनेता अनुपम खेर यांनीदेखील संताप व्यक्त केला आहे.
अनुपम खेर यांनी ट्विटरवर एक पोस्ट शेअर करत दगडफेक करणाऱ्यांवर टीकास्त्र डागलं आहे. तसंच याप्रकरणी जे शांत आहेत त्यांच्यावरही त्यांनी आगपाखड केली आहे.

“जेव्हा डॉक्टरांवर कोणी हल्ला केल्याचं कानावर पडतं त्यावेळी प्रचंड खेद वाटतो आणि तितकाच रागही येतो. जे आपला जीव वाचवतात त्यांच्यावरच आपण प्राणघातक हल्ला कसा काय करु शकतो. # मोरारबादमधील डॉक्टरांचा रक्ताने लथपथ झालेला चेहरा पाहून प्रचंड त्रास झाला. या सगळ्या प्रकरणात काही महत्त्वाच्या व्यक्तींनी मौन बाळगलं ते पाहून जास्त त्रास झाला!?”, असं ट्विट अनुपम खेर यांनी केलं आहे.

दरम्यान, काही प्रसारमाध्यमांनी दिलेल्या बातमीनुसार, मोरारबाद भागात काही दिवसांपूर्वी एका रुग्णाचा करोनामुळे मृत्यू झाला होता. यानंतर त्याच्या परिवारातील लोकांना क्वारंटाइन करण्याचे आदेश वैद्यकीय अधिकाऱ्यांना देण्यात आले होते. या परिवाराची तपासणी करुन त्यांना क्वारंटाइन सेंटरमध्ये घेऊन जाण्यासाठी आलेल्या डॉक्टर आणि वैद्यकीय अधिकाऱ्यांवर येखील नागरिकांनी दगडफेक करत हल्ला केला, ज्यात काही डॉक्टरांनाही गंभीर दुखापत झाली.