X
X

अजय देवगणच्या ट्विटला मुंबई पोलिसांचं भन्नाट उत्तर, नेटकरी म्हणतायत जबरदस्त

READ IN APP

मुंबई पोलिसांनी ट्विटरला एक व्हिडीओ शेअर केला असून त्यावर सेलिब्रेटी व्यक्त होत आहेत

करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पोलीस आपला जीव धोक्यात घालून रस्त्यांवर जागता पहारा देत आहेत. लॉकडाउनच्या नियमांचं उल्लंघन होऊ नये यासाठी ठिकठिकाणी पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त लावण्यात आला आहे. मुंबई पोलिसांनी ट्विटरला एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओवर अनेक सेलिब्रेटींनी प्रतिक्रिया दिली असून मुंबई पोलिसांना सलाम केला आहे. यामध्ये अभिनेता अजय देवगणचाही समावेश आहे. अजय देवगणच्या ट्विटला मुंबई पोलिसांनी भन्नाट उत्तर दिलं असून नेटकऱ्यांची मनं जिंकत आहे.

२१ दिवसांचा लॉकडाउन तुम्हाला खूप मोठा वाटतोय का? मात्र आम्ही या २१ दिवसात घरी असतो तर काय केलं असतं तुम्हाला पहायचंय का?, असं म्हणत मुंबई पोलिसांनी एक व्हिडिओ आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये करोनामुळे जाहीर करण्यात आलेल्या लॉकडाउनच्या काळात ‘ऑन ड्युटी’ असणाऱ्या पोलिसांनी २१ दिवसात काय केलं असतं यासंदर्भातील आपल्या इच्छा व्यक्त केल्या आहेत.

अजय देवगणने या व्हिडीओवर केलेल्या ट्विटला मुंबई पोलिसांनी उत्तर देत म्हटलं आहे की, “डिअर सिंघम…तेच करत आहोत जे ‘खाकी’ करणं अपेक्षित आहे, जेणेकरुन गोष्टी पुन्हा एकदा तशाच होतील ‘वन्स अपॉन अ टाइम इन मुंबई”.

मुंबई पोलिसांनी दिलेलं हे भन्नाट उत्तर नेटकऱ्यांना प्रचंड आवडत आहे. अजय देवगणने पोलिसांवर आधारित ‘खाकी’ चित्रपटात काम केलं होतं. तसंच ‘वन्स अपॉन अ टाइम इन मुंबई’ चित्रपटात मुख्य भूमिका निभावली होती. या दोन्ही चित्रपटांच्या नावाचा आधार घेत मुंबई पोलिसांनी दिलेलं उत्तर नेटकऱ्यांच्या पसंतीस पडलं आहे.

दरम्यान अजय देवगणने ट्विट करत म्हटलं आहे की, “प्रिय मुंबई पोलीस…तुम्ही जगातील सर्वोत्तम असणाऱ्यांपैकी एक म्हणून ओळखले जाता. करोनाशी लढा देताना तुम्ही दिलेलं योगदान अतुलनीय आहे. तुम्ही जेव्हा कधी सांगाल तेव्हा हा सिंघम खाकी घालून तुमच्या खांद्याला खांदा लावून रस्त्यावर उतरण्यास तयार आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र”.

आणखी वाचा- “तुम्ही फक्त आवाज द्या, हा सिंघम खाकी घालून मैदानात उतरेल”, अजय देवगणचं मुंबई पोलिसांना आवाहन

अजय देवगणने इतर सेलिब्रेटींप्रमाणे आर्थिक मदतही केली आहे. अजय देवगणकडून पीएम केअर फंडसाठी २५ कोटी ५१ लाख तर महाराष्ट्र मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी पाच कोटींची आर्थिक मदत दिली आहे. याशिवाय अजय देवगणकडून फेडरेशन ऑफ वेस्टर्न सिने एम्प्लॉइजला ५१ लाखांची मदत देण्यात आली आली. अशोक पंडित यांनी ट्विट करत ही माहिती दिली होती. कठीण परिस्थिती असते तेव्हा आपण खरे सिंघम असल्याचं वारंवार सिद्ध केलं आहेस अशा शब्दांत अशोक पंडित यांनी अजय देवगणचे आभार मानले होते.

22
X