Coronavirus outbreak : दिल्लीमधील निजामुद्दीनमध्ये तबलिकी मरकज या धार्मिक कार्यक्रमाचं आयोजन करत नियमांचं उल्लंघन करणाऱ्या आणि करोनाचा फैलाव करणाऱ्या दिल्लीमधील निजामुद्दीन मरकजचे प्रमुख मौलाना साद फरार आहेत. पोलिसांनी एफआयआर दाखल केल्यानंतर मौलाना साद फरार झाले आहेत. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ८२४ परदेशी नागरिकांसहित शेकडो भारतीयांनी दिल्लीमधील निजामुद्दीन येथील मरकजमध्ये हजेरी लावली होती.

दिल्ली पोलिसांनी इंडिया टुडे वृत्तावाहिनीशी बोलताना दिलेल्या माहितीनुससार, मोहम्मद साद यांचा शोध घेण्यासाठी पोलिसांची दोन पथकं उत्तर प्रदेशात पाठवण्यात आली आहेत. त्यांच्या नातेवाईकांचीही चौकशी केली जात आहे. मोहम्मद साद यांच्या नातेवाईकांच्या घराचीही झाडाझडती घेण्यात आली आहे. दिल्ली पोलीस त्या कार्यक्रमातील महत्त्वाची माहिती तपास यंत्रणांना देत आहेत, जेणेकरुन त्यांचा ठावठिकाणा शोधून त्यांना क्वारंटाइन करण्यात येईल. तसेच, पोलीस त्या १४ रुग्णालयांच्या संपर्कातही आहेत, जिथे मरकजमध्ये हजर असलेल्यांना उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. बंगाली चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री आणि खासदार नुसरत जहाँ यांनीही या प्रकरणावर आपले मत व्यक्त केले आहे.

नुसरत यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना या प्रकरणावर भाष्य केले आणि त्या प्रकारावर टीका केली त्यासोबतच, या कसोटीच्या काळात अशा प्रकारचे कोणतेही सार्वजनिक कार्यक्रम आयोजन करू नयेत, असे आवाहन साऱ्यांना केले आणि आपापल्या घरात सुरक्षित राहण्याचा सल्ला दिला.

नुसरत म्हणाल्या की, मी सगळ्यांना हात जोडून विनंती करते की आता आपण सारे कठीण परिस्थितीचा सामना करत आहोत. अशा वेळी आपण धार्मिक, राजनैतिक किंवा जातीपातीच्या गप्पा-गोष्टी बाजूला ठेवल्या पाहिजेत. बाहेर भटकून अफवा पसरवण्यापेक्षा आपल्या घरात सुरक्षित राहण्यातच साऱ्यांचे हित आहे. आपण साऱ्यांनीच सावध राहायला हवे. कोणताही व्हायरस धर्म पाहून हल्ला करत नाही, त्यामुळे तुम्ही कोणत्याही धर्माचे असाल तरी तुम्ही करोनाचा धोका लक्षात घ्यायलाच हवा.

दरम्यान, सध्या कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या सर्वांना रुग्णालयातून सोडल्यानंतर जबाब नोंदवला जाणार आहे. पोलिसांकडून मशिदीतून २३६१ जणांना बाहेर काढण्यात आलेलं असून यामधील ६०६ जणांमध्ये करोनाची लक्षणं आढळली आहेत. कार्यक्रमाला हजर असणाऱ्यांपैकी शेकडो जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत.