काही दिवसांपूर्वी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ड्रोनाल्ड ट्रम्प यांनी ‘अमेरिकेत करोनाग्रस्त रुग्णांवर योग्य पद्धतीने उपचार सुरु असून लवकरच आम्ही यातून मार्ग काढू’ असं सांगितलं होतं. मात्र ट्रम्प यांचा दावा खोटा असल्याचा आरोप विनोदवीर कॅथी ग्रिफिनने केला आहे. ट्विटरवर एक फोटो शेअर करत तिला रुग्णालयात कशी वागणूक मिळतीये याविषयीचं कथन केलं आहे.

‘फर्स्ट पोस्ट’नुसार, कॅथी ग्रिफिन ही हॉलिवूडमधील लोकप्रिय विनोदवीर असून तिला करोनाची लागण झाली आहे.  त्यामुळे कॅथीवर सध्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत. परंतु ट्रम्प यांनी केलेल्या दाव्यानुसार रुग्णालयात कोणत्याच सुविधा मिळत नसल्याचं तिचं म्हणणं आहे. इतकंच नाही. तर, रुग्णालयात करोनाग्रस्तांची योग्य पद्धतीने काळजी घेण्यात येत नसल्याचं म्हटलं आहे. सोबतच ट्रम्प खोटं बोलत असल्याचा आरोपही तिने केला आहे.

‘राष्ट्राध्यक्ष ट्रम्प खोटं बोलत आहेत. मला एका चांगल्या रुग्णालयाच्या विशेष उपचार कक्षातून घाईघाईनं करोनाचा उपचार करण्यात येणाऱ्या विलगीकरण कक्षात हलवण्यात आलं. मला जाणवत असलेली लक्षणं प्रचंड त्रासदायक होती. मात्र, रोग नियंत्रण व प्रतिबंध केंद्रांनी (CDC ) घातलेल्या काही निर्बंधांमुळे माझी तपासणी करण्यात आली नाही,असं ट्विट कॅथीने केलं आहे.

दरम्यान, चीनमधून फैलाव झालेल्या करोना विषाणूने जगभरात हातपाय पसरले आहे. आतापर्यंत हॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटींना करोनाची लागण झाली आहे. यात डॅनियल डे,शार्लेंट लॉरेन्स,अँटी कोहेन,मॅथ्यूज या कलाकारांचा समावेश आहे.