देशातील करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ३ मे पर्यंत लॉकडाउनची घोषणा करण्यात आली आहे. २५ मार्चपासून सुरु झालेल्या लॉकडाउनला आज एक महिना उलटला आहे. या लॉकडाउनमुळे अनेक उद्योग धंदे ठप्प झाले आहेत. मनोरंजन क्षेत्रालाही याचा फटका बसला आहे. बॉलिवूडबरोबरच राज्यांमधील प्रदेशिक मनोरंजन सृष्टीलाही मोठा आर्थिक फटका बसाल आहे. अनेक बडे कलाकार घरीच असले तरी स्थानिक स्तरावरील छोट्या कलाकारांचे हाल झाले आहेत. ओडिशामधील अशाच एका लोकप्रिय कॉमेडियनवर चक्क भाजी विकण्याची वेळ आली आहे. रवी कुमार असं या विनोदवीराचे नाव असून तो सध्या उदर्निवाह चालवण्यासाठी सायकलवरुन घरोघरी जाऊन भाजी विकत आहे.

हाती काहीच काम नसल्यामुळे आणि घरातील सर्व सदस्यांचा उदर्निवाह चालवण्यासाठी ३९ वर्षीय रवी कुमारने भाजी विक्रीचा व्यवसाय सुरु केला आहे. अनेक ओडिया चित्रपटांमध्ये विनोदी भूमिका साकारणाऱ्या रवीवर त्याच्या आई वडिलांसहीत कुटुंबातील ११ सदस्यांची जबाबदारी आहे. सध्या तो भुवनेश्वर शहरामधील गल्ल्यांमध्ये अभिनेत्यांचे आवाज काढत भाजी विक्री करत आहे. अमिताभ बच्चन, धर्मेंद्र, नाना पाटेकर  अशा अभिनेत्यांच्या आवाजात हाक देत तो भाजी विक्री करताना दिसत आहे.

फोटो सौजन्य: एएनआय

“मी सध्या समांतरपूर भागामध्ये भाजी विक्रीचा व्यवसाय करतो. मी वांगी, पडवळ, भोपळा यासारख्या भाज्या दारोदारी जाऊन विकतो. २५ मार्च रोजी लॉकडाउनची घोषणा झाली तेव्हा मी ‘बाली’ नावाच्या ओडिया भाषेतील चित्रपाटाचे चित्रिकरण करत होतो. मात्र लॉकडाउनमुळे चित्रिकरण थांबवण्यात आलं आणि माझी कमाई बंद झाली. माझ्याकडे वॉल पेंटिंग करण्याबरोबर ट्रॅकवर पेटींग करण्याची कलाही माझ्याकडे आहे. मात्र सध्या तेही शक्य नसल्याने मी भाजी विक्री सुरु केली आहे,” असं रवीने ‘हिंदुस्तान टाइम्स’शी बोलताना सांगितले.  रवीने ३० ओडिया चित्रपट आणि १० मालिकांमध्ये काम केलं असून तो अनेक म्युझिक अल्बममध्येही झळकला आहे.

‘माझ्यावर माझी दोन मुले आणि दिवंगत भावाच्या चार मुलांची जबाबदारी आहे. म्हणून मी भाजीपाला विकण्यास सुरुवात केली. काही लोकांनी मला पेटींगची ऑफर देत पैसे देण्याची तयारी दर्शवली होती. मात्र त्यामुळे लॉकडाउनच्या नियमांचे उल्लंघन झालं असतं म्हणून मी ते काम नाकारलं. लॉकडाऊन दरम्यान भाजी विक्री अत्यावश्यक सेवांपैकी एक असल्याने मी हा पर्याय निवडला,’ असंही रवीने सांगितलं.