बॉलिवूड गायिका कनिका कपूर पाठोपाठ चित्रपट निर्माते करिम मरोनी यांची मुलगी झोया मोरानीला करोना झाल्याचे समोर आले होते. त्यानंतर चित्रपटसृष्टीमध्ये खळबळ उडाली होती. पण झोयाने करोनावर मात केली. तिची दुसरी करोना चाचणी निगेटीव्ह आली. त्यानंतर तिने करोनाशी झुंज देणाऱ्या व्यक्तींच्या प्लाझ्मा थेरपीसाठी रक्तदान करण्याची इच्छा व्यक्त केली होती. आता तिने सोशल मीडिया पोस्टद्वारे रक्तदान केल्याचे सांगितले आहे.

करोना व्हायरसच्या उपचारांमध्ये प्लाझ्मा थेरपी प्रभावी ठरत आहे. प्लाझ्मा थेरपीमुळे गंभीर अवस्थेत असलेल्या अनेक रुग्णांच्या प्रकृतीत वेगाने सुधारणा झाली आहे. त्यामुळे झोयान रक्त दान करण्याचा निर्णय घेतला होता. झोयाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये तिने नायर रुग्णालयात रक्तदान करतानाचा फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये ती रक्तदान करत आहे आणि तिच्या आजूबाजूला डॉक्टर असल्याचे दिसत आहे. रक्तदान केल्यानंतर तिला प्रमाणपत्र आणि ५०० रुपये देण्यात आल्याचे ती आनंदी असल्याचे तिने पोस्टमध्ये म्हटले आहे.

‘मी नायर रुग्णालयात प्लाझ्मा थेरपीसाठी रक्तदान करत आहे’ असे तिने फोटो शेअर करत कॅप्शन दिले आहे.

“करोना चाचणीचा रिपोर्ट निगेटिव्ह आलेला व्यक्ती पुढच्या १४ दिवसांपर्यंत रक्तदान करु शकतो. या व्यक्तीच्या शरीरात करोनाशी लढणारे अ‍ॅण्टिबॉडीज तयार होतात. यांचा वापर इतर लोकांना बरे करण्यासाठी केला जाऊ शकतो. त्यामुळे मी रक्तदान करण्याचा निर्णय घेतला आहे” असे ती काही दिवसांपूर्वी मुंबई मीररला दिलेल्या मुलाखतीमध्ये म्हणाली होती. आता झोयाने रक्तदान केल्याचे सोशल मीडियाद्वारे म्हटले आहे.

काय आहे प्लाझ्मा थेरपी
विशिष्ट रोगातून बऱ्या झालेल्या रुग्णाच्या रक्तातील प्लाझ्मा त्याच आजाराच्या अन्य रुग्णांच्या शरीरात वापरला जातो. प्लाझ्मामध्ये आपल्या रक्तपेशी असतात. त्यात अ‍ॅण्टिबॉडीजदेखील असतात. त्या शरीरावर होणाऱ्या बाह्य आक्रमणाला परतवून लावण्यात आघाडीवर असतात. एकदा तसे झाले की आपल्या रक्तपेशी पुन्हा त्याच प्रकारचे आक्रमण झाले तर आधीच आक्रमण लक्षात ठेवून वेळीच शत्रूला ओळखतात आणि त्याचा प्रतिकार करतात.