करोना विषाणूने संपूर्ण जगात थैमान घातले आहे. जगभरातील लाखो लोकांना या प्राणघातक विषाणूची लागण झाली आहे. करोनामुळे लोकांचं जनजीवन विस्कळीत झालं आहे. या करोनाला रोखणारी लस विकसित करण्यासाठी आज अमेरिका, ब्रिटन, जर्मनी, फ्रान्स, चीन असे अनेक देश प्रयत्न करत आहेत. मात्र ही बहुप्रतिक्षित करोना लस येणार कधी? हा प्रश्न सर्वांनाच सतावतोय. मात्र या प्रश्नाचं उत्तर दिलंय प्रसिद्ध लेखक चेतन भगत यांनी. पुढच्या वर्षी फेब्रुवारी महिन्यात करोना लस सर्वसामान्य लोकापर्यंत पोहोचेल असा दावा त्यांनी केला आहे.

नेमकं काय म्हणाले चेतन भगत?

“जगभरातील शेअर मार्केट विशेषत: अमेरिकी शेअर मार्केटवर लक्ष देता असं वाटतय की करोनावरील लवकरच येणार आहे. माझ्या मते सर्व ट्रायल ऑक्टोंबर २०२० पर्यंत पूर्ण होतील. डिसेंबर २०२०पर्यंत या लसीला सर्व प्रकारच्या संमती मिळतील. आणि २०२१ फ्रेब्रुवारी महिन्यात सर्वसामान्य लोकांपर्यंत लस पोहोचेल.” अशा आशयाचं ट्विट चेतन भगत यांनी केलं आहे. करोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर त्यांच हे ट्विट सध्या सर्वत्र चर्चेत आहे.

देशातील करोना रुग्ण १९ लाखांवर

गेल्या २४ तासांमध्ये ५२ हजार ५०९ रुग्णांची नोंद झाली असून ८५७ मृत्यू झाले आहेत. एकूण करोना रुग्णांची संख्या १९ लाख ८ हजार २५४ वर पोहोचली असून ३९ हजार ७९५ मृत्यू झाले आहेत. गेल्या २४ तासांमध्ये ५१ हजार ७०६ रुग्ण बरे झाले. ५ लाख ८६ हजार २४४ रुग्ण उपचाराधीन आहेत, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली.