करोनाची दहशत सध्या संपूर्ण जगभरात पसरल्याचे पाहायला मिळते. अनेक देशांमध्ये करोनाचा फटका वाहतूक, पर्यटन व्यवसाय, उद्योगधंदे यांच्यावर हळूहळू बसत असल्याचे पाहायला मिळते. भारतात मनोरंजन विश्वालाही याची झळ पोहोचली आहे. अनेक चित्रपटांचे चित्रीकरण हे चीनमध्ये होणार होते. मात्र करोनामुळे ते रद्द करण्यात आले आहे.

चीनमध्ये चित्रीकरण होणाऱ्या चित्रपटांच्या यादी मधील एक चित्रपट म्हणजे ‘इंडियन २.’ पण करोनामुळे चित्रपटाचे चीनमधील चित्रीकरण सध्या रद्द करण्यात आले असून चित्रीकरणाच्या तारखा पुढे ठकलण्यात आल्या आहेत. तसेच अमेरिकन गायक खालिद एप्रिल महिन्यात मुंबई आणि बंगळुरु शहरात टूरसाठी येणार होता. मात्र त्याने आता ही म्युझिकल टूर रद्द केल्याचे समोर आले आहे.

आणखी वाचा- करोनाचा धसका…मराठी कलाकार साजरी करणार नाहीत धुळवड

चित्रपटसृष्टीमधील अनेक महत्त्वाचे फिल्म फेस्टिव्हल आणि कार्यक्रम चीन, हाँगकाँगमध्ये पार पडतात. मात्र करोनामुळे ते पुढे ढकलण्यात आले आहेत. बॉलिवूडमधील ‘गुड न्यूज’ हा चित्रपट हाँगकाँगमध्ये फेब्रुवारी महिन्यात प्रदर्शित होणे अपेक्षित होते. मात्र चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख बदलण्यात आल्याची माहिती चित्रपट व्यापार विश्लेषक अतुल मोहन यांनी दिली आहे.