अनेक चित्रपटांमध्ये खलनायकी भूमिका साकारणारे अभिनेते कबीर बेदी. त्यांच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. कबीर यांचं आत्मचरित्र लवकरच त्यांच्या चाहत्यांना वाचायला मिळणार आहे. या पुस्तकाचं मुखपृष्ठ नुकतंच प्रकाशित करण्यात आलं.

अभिनेते कबीर बेदी यांच्या ‘स्टोरीज आय मस्ट टेल: द इमोशनल लाईफ ऑफ ऍन ऍक्टर’ या आत्मचरित्राच्या मुखपृष्ठाचं प्रकाशन ७ एप्रिल रोजी करण्यात आलं. बॉलिवूडचा लोकप्रिय अभिनेता सलमान खानच्या हस्ते हे प्रकाशन करण्यात आलं. हे पुस्तक १९ एप्रिल २०२१ रोजी प्रकाशित करण्यात येणार आहे. वेस्टलँड पब्लिकेशन्सकडून हे पुस्तक प्रकाशित केले जाईल.

या पुस्तकाच्या मुखपृष्ठाबद्दल बोलताना कबीर म्हणाले, “मुखपृष्ठ म्हणून वापरलेला हा फोटो सत्तरच्या दशकात टेरी ओ निल या फोटोग्राफरने काढला आहे.” यावेळी कबीर यांनी त्यांच्या आत्मचरित्रात लिहिलेल्या त्यांच्या अनुभवांविषयीही सांगितलं. ‘बीटल्स’ची मुलाखत घेणे त्यांच्या आयुष्यातला टर्निंग पाँईट कसा ठरला याबद्दलही त्यांनी सांगितलं आहे. ऑल इंडिया रेडिओ ते जाहिरात क्षेत्र, तिथून नाटकं आणि मग चित्रपटसृष्टी या त्यांच्या प्रवासाबद्दल कबीर यांनी आपल्या आत्मचरित्रात लिहिलं आहे.

आपल्या आईवडिलांविषयीही त्यांनी यात लिहिलं आहे. या पुस्तकावर एखादा चित्रपट किंवा एखादी वेबसीरीजही बनू शकते असंही ते म्हणाले.
कबीर यांना त्यांच्या पुस्तकाबद्दल शुभेच्छा देताना सलमान खान म्हणाला, “तुमचं व्यक्तिमत्व एक कलाकार आणि माणूस म्हणूनही खूप शुद्ध आणि नितळ आहे. त्यामुळे या पुस्तकात जे काही आहे ते तुमच्या मनातून आलेलं असणार आहे. त्यामुळे हे वाचायला मजा येईल आणि तुमच्या अनुभवांमधून लोक बरंच काही शिकतील अशी आशा आहे.”

कबीर बेदी यांचं ‘स्टोरीज आय मस्ट टेलः द इमोशनल लाईफ ऑफ ऍन ऍक्टर’ हे आत्मचरित्र १९ एप्रिल २०२१ रोजी प्रकाशित होईल आणि ते भारतातल्या सर्व पुस्तक दुकानांमध्ये तसंच ऑनलाईनही उपलब्ध होईल.

अभिनेते कबीर बेदी यांनी बॉलिवूडसोबतच हॉलिवूडमध्येही आपली ओळख निर्माण केली आहे. ते युरोपातील एक आघाडीचे स्टार आहेत. त्यांनी एका बाँडपटात कामही केलं आहे. त्यांनी चित्रपट, मालिका, नाटकं अशा सर्व क्षेत्रात काम केलं आणि यश मिळवलं आहे. कबीर हे केवळ भारतीय सेलिब्रिटी नसून आंतरराष्ट्रीय सेलिब्रिटी आहेत.