करोना व्हायरसमुळे संपूर्ण देशात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दिवसेंदिवस करोनाचा संसर्ग झालेल्यांची संख्या वाढतच चालली आहे. अनेक कलाकारांना देखील करोनाचा संसर्ग झालेल्या समोर आले होते. आता अभिनेत्री इशिका बोराहला करोनाचा संसर्ग झाल्याचे समोर आले आहे. पण तिला करोनावर उपचार घेत असताना हॉस्पिटलमध्ये आत्महत्या करण्याचा विचार डोक्यात आला असल्याचे तिने सोशल मीडिया पोस्टमध्ये म्हटले आहे.

इशिका बोराहची करोना चाचणी पॉझिटीव्ह आली होती. त्यानंतर आसाममधील नागाव येथील सरकारी रुग्णालयात तिला जबरदस्ती नेण्यात आले. इशिका मुंबईत राहत होती. पण करोनामुळे उद्भवलेल्या परिस्थितीमुळे ती तिच्या मुळ गावी गेली. तिने सोशल मीडियावर पोस्ट करत तेथील सरकारी रुग्णालयाच्या आयसोलेशन विभातील सुविधांबाबत माहिती देत नाराजगी व्यक्त केली आहे.

‘मी इशिका बोहरा, मला जबरदस्ती नागावच्या सरकारी रुग्णालयात आणण्यात आले. मी मुंबईत राहत होते. पण मी माझ्या मुळ गावी आसामला आले आहे’ असे तिने म्हटले आहे.

नंतर तिने आणखी एक ट्विट करत सरकारी रुग्णालयातील सुविधांविषयी सांगितले आहे. हॉस्पिटलमध्ये तिला थंड पाणी पिण्यासाठी देण्यात आले होते. तसेच तेथे मच्छरही असल्याचे तिने पोस्टमध्ये म्हटले आहे.

त्यानंतर तिने आणखी एक ट्विट करत मदतीची विनंती केली आहे. ‘मी असं ऐकलय करोनाचा संसर्ग झाल्यावर गरम पाण्यात हळद घालून देतात. क जीवनसत्त्वे देतात. हे सर्व करोनावर मात करण्यासाठी मदत करते. कृपया माझी मदत करा’ असे तिने ट्विटमध्ये म्हटले आहे. तसेच पुढे तिने हॉस्पिटलमधील सुविधा पाहून आलेल्या मानसिक तणावामुळे आत्महत्या करण्याचा विचार डोक्यात आला असल्याचे म्हटले आहे.