रेश्मा राईकवार

टाळेबंदीच्या काळात चित्रपट-नाटक अगदी मालिकाही काही काळ थांबल्या होत्या. मात्र या सगळ्या घडामोडीत एक गोष्ट थांबली नव्हती ती म्हणजे मोबाइल, टीव्हीसह सगळीकडे वाजणारी गाणी. टेलीव्हिजनबरोबरच ‘गाना’, ‘सावन’, ‘स्पॉटीफाय’सारख्या स्ट्रीमिंग अ‍ॅपवरूनही गाणी घराघरांत वाजत होती. आपल्या आवडीची गाणी या अ‍ॅपवर शोधून ती वाजवणं ही फार सोपी गोष्ट आहे. आपल्या आवडीचे संगीतकार, गायक-गायिका किंवा अगदी कलाकारांची नावं टाकली तरी त्यांच्या गाण्यांची यादी झर्रकन आपल्यासमोर झळकते. पण या सगळ्या यादीत ते गाणे जन्माला घालणारा गीतकार मात्र कु ठेच नसतो. खुद्द त्या गीतकारालाही आपली गाणी या यू-टय़ुबपासून इतर कोणत्याही स्ट्रीमिंग अ‍ॅपवर शोधायची असतील तर संगीतकार किं वा गायक-गायिकांचे नाव टाकण्याची नामुष्की ओढवते. ही परिस्थिती आज निर्माण झालेली नाही. गेली कित्येक वर्षे याबद्दल कधी मोठय़ाने, कधी शांतपणे आवाज उठवून झालेला असला तरी ही परिस्थिती जैसे थेच आहे. किमान, आजच्या समाजमाध्यमांवरून ट्रेण्डिंग होणाऱ्या पद्धतीने तरी ‘क्रे डिट दे दो यार..’ हा मुद्दा स्ट्रीमिंग कंपन्यांना प्रेमाने सांगून पाहावा यासाठी हिंदीतील नामांकित १५ गीतकार एकत्र आले आणि त्यांनी गाण्यातून याकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न के ला आहे. त्यांच्या गाण्याला बॉलीवूडमधील संगीतकार, दिग्दर्शक, कलाकार सगळ्यांनीच प्रतिसाद दिला असला तरी यातून श्रेयाचा हा प्रश्न खरंच सुटणार आहे का?  स्वानंद किरकिरे, नीलेश मिश्रा, अभिजीत भट्टाचार्य, वरुण ग्रोव्हर, कौसर मुनीर, समीर अंजान, अन्विता दत्त अशा नव्या-जुन्या गीतकारांनी या गाण्यातून पुन्हा एकदा आवाहन करण्याचा प्रयत्न के ला आहे. मराठीतही गीतकार-लेखकांनी चित्रपटाच्या संगीत प्रकाशन सोहळ्यातही गीतकाराला बोलवले जात नाही, याबद्दल खंत व्यक्त के ली होती. मात्र हरप्रकारे प्रयत्न करूनही अद्याप गीतकारांना श्रेय देणे कोणालाच का जमत नाही..?, हा प्रश्न अनुत्तरितच असल्याचे ही मंडळी सांगतात.

गाण्याच्या माध्यमातून व्यक्त होऊ या

गीतकार-लेखकाला श्रेय न देण्याचा हा मुद्दा केवळ हिंदी चित्रपटांपुरता मर्यादित नाही. देशभरातील विविध भाषिक गीतकार-लेखकांना गेली कित्येक वर्षे या समस्येला सामोरं जावं लागतं आहे. मराठी, तमिळ, तेलुगू प्रत्येक चित्रपटसृष्टीत ही समस्या आहे. पूर्वी आकाशवाणीवर गाणी वाजवली जायची तेव्हा त्यात गीतकाराचा आवर्जून उल्लेख के ला जात होता. नंतर कॅ सेट-सीडीवर गाणी आली तरी त्यावर गीतकाराचे नाव नमूद के लेले असायचे. मात्र यू-टय़ुब आल्यापासून गाण्यांचा खजिना प्रेक्षकांसमोर उलगडला असला तरी त्यातून गीतकाराचे नावच गायब झालेले दिसते. गाना, स्पॉटीफायसारखी असंख्य स्ट्रीमिंग अ‍ॅप्स सध्या उपलब्ध आहेत. टेलीव्हिजनवरही गाणी दाखवली जातात, मात्र या माध्यमांमध्ये कु ठेच गीतकाराला त्याच्या गाण्याचे श्रेय दिले जात नाही. गीतकाराला श्रेय देण्याची व्यवस्थाच या माध्यमांमध्ये नाही. यासंदर्भात, मी ट्विटरवर ट्वीट के लं होतं. स्ट्रीमिंग अ‍ॅपवर असलेल्या गाण्याखाली संगीतकार-गायक-गायिकांचा उल्लेख आहे, पण गीतकाराचा नाही, हे मी छायाचित्रासह पोस्ट के लं होतं. त्या ट्वीटला खूप चांगला प्रतिसाद मिळाला. त्यावर इतर गीतकारांशी चर्चा सुरू असताना याच समाजमाध्यमांचा वापर करून निषेध व्यक्त करायचा. मात्र सध्या सगळीकडेच तणावाचे वातावरण असल्याने संतापाने नाही तर आपल्याला उत्तम जमतं त्या गाण्याच्या माध्यमातून व्यक्त होऊ या.. असा आम्ही निर्णय घेतला. आणि हिंदीतील सगळ्या नामांकित गीतकार मंडळींनी या गाण्याच्या निमित्ताने एकत्र येत याबद्दल आवाज उठवला आहे.

स्वानंद किरकिरे

सगळ्यांनी एकत्रित आवाज उठवायला हवा

‘देवाक काळजी रे’ या माझ्या गाण्याला शंभर दशलक्ष दर्शकसंख्या आहे, पण या गाण्याखाली गीतकार म्हणून माझं नावच नाही. ‘माऊली माऊली’ आणि अशी माझी कित्येक गाणी खूप लोकप्रिय आहेत पण ती मी लिहिली आहेत, असं मला सांगावं लागतं. अनेकदा तुम्ही कसे काय गीतकार त्याचे? तुमचं नावच नाही, अशी उलट विचारणा के ली जाते. हल्ली तर मला टेलीव्हिजनवर जे ‘सारेगम’सारखे शोज आहेत त्यातून ओळख मिळायला लागली आहे. तिथे गीतकाराचा उल्लेख के ला जातो, त्यामुळे लोकांना आमची माहिती मिळते. मग रिअ‍ॅलिटी शोमध्ये जर गीतकाराचं नाव घेतलं जाऊ शकतं तर इतर ठिकाणी त्याचे नाव का दिलं जात नाही? पूर्वी गीतकारांना स्वत: कॅ सेट किं वा सीडीवरचे वेष्टन घेऊन नोंदणीसाठी जावं लागायचं. तेव्हा गीतकाराला पैसे द्यावे लागू नयेत म्हणून अनेकदा टाळाटाळ के ली जायची. आता इंटरनेटवर सगळा तपशील अपडेट होत असतो, तरीही गीतकाराचंच नाव वगळलं जातं.  किमान संगीतकारांनी तरी निर्मात्यांना त्यांच्या इतर अटींप्रमाणेच गीतकाराचे नाव आणि त्याचे मानधन देण्याविषयी अट घालायला हवी. कारण आम्ही त्यांच्यासाठी गाणी लिहितो आणि गाणं पूर्ण करून तेच निर्मात्यांना देतात. त्यामुळे त्यांच्याकडून याबाबतीत प्रयत्न व्हायला हवेत. मला वाटायचं हिंदीत गीतकारांना ही समस्या नसावी, पण आता त्यांनी गाण्यांच्या माध्यमातून प्रयत्न के ल्यावर ही सगळ्यांचीच समस्या आहे हे जाणवतं आहे. त्यामुळे सगळ्यांनी एकत्रित येऊन याविरोधात आवाज उठवायला हवा.

गुरू ठाकूर

 नाहीतर कायदेशीर मार्ग अवलंबावा लागेल

गीतकार-लेखकांवर हा कायम अन्याय होत आला आहे. आम्ही संगीत कं पन्या, निर्माते यांच्याकडे वेगळं काही मागत नाही आहोत, पण जी गाणी आम्ही लिहिली आहेत त्याचे श्रेय आम्हाला मिळालं पाहिजे. तो आमचा मूलभूत हक्क आहे, त्यात छेडछाड करू नका, एवढेच आम्ही सांगत आलो आहोत. ‘आयपीआरएस’ (इंडियन परफॉर्मिग राईट्स असोसिएशन) या आमच्या संस्थेमुळे आमची गाणी जिथे जिथे वाजतात तिथून आम्हाला त्याचे मानधन मिळते. पण ते मानधन मिळण्यासाठीही ते गाणे लिहिणाऱ्या गीतकाराच्या नावाचा उल्लेख असावा लागतो. अन्यथा हा सगळा पैसा संगीत कंपनीकडे जातो. गाण्यांमागचे हे जे राजकारण आहे ते संपवलं पाहिजे. आता तर टेलीव्हिजनवरही एवढय़ा संगीताला वाहिलेल्या वाहिन्या आहेत तिथेही गीतकाराचं नाव देणं टाळलं जातं. हे कुठे ना कु ठेतरी थांबलं पाहिजे आणि यासाठी आम्ही सध्या प्रत्येक माध्यमावर याबद्दल आवाज उठवत आहोत. ‘फिल्म रायटर्स असोसिएशन’ही आमच्याबरोबर सहभागी असून तुम्ही प्रेमाने आमचा हक्क आम्हाला द्या असे आम्ही सांगत आहोत. हे सांगूनही त्याबाबतीत पुढे काही घडणार नसेल तर कायदेशीर मार्ग अवलंबावा लागेल.         ल्लसमीर अंजान

रेकॉर्डिग स्टुडिओकडून यासाठी प्रयत्न होऊ शकतात

गेली दहा वर्षे मी याबद्दल आवाज उठवतो आहे, पण गीतकार-लेखकाला त्यांचं श्रेय दिलं जात नाही. गाणं असो वा चित्रपट लिहिणारा हा या प्रक्रियेतील पहिला घटक असतो, मात्र मानधन देताना या घटकाचा सगळ्यात शेवटी विचार के ला जातो. सगळ्यांचे पैसे देऊन झाले की मग गीतकारांचा विचार के ला जातो, हे उघड चित्र आहे. रेकॉर्डिग स्टुडिओ यासाठी निश्चित प्रयत्न करू शकतात. जोपर्यंत रेकॉर्डिग स्टुडिओला त्यांच्या करारानुसार पैसे मिळत नाहीत तोवर गाणं निर्मात्यांकडे दिलं जात नाही. याच स्तरावर जर गीतकाराचेही पैसे, त्याचे श्रेय योग्य पद्धतीने दिलं गेलं आहे की नाही, हे निर्मात्यांना विचारलं जाऊ शकतं, पण तसं के लं जात नाही. अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाकडे दाद मागितल्यावर त्यांच्याकडून निश्चितपणे मदत मिळते, मात्र महामंडळाकडे दाद मागणं ही शेवटची पायरी आहे. गीतकाराला त्याचे श्रेय हे मनापासून दिलं गेलं पाहिजे, ते जबरदस्तीने मागण्याची गरज पडता कामा नये.

मंदार चोळकर

गीतकाराला श्रेय द्या हे ठणकावून सांगितलंच पाहिजे

यु-टय़ूब काय किं वा इतर स्ट्रीमिंग अ‍ॅप्सवर ज्या नावांनी गाण्यांचा शोध घेतला जातो त्यांचा उल्लेख प्रामुख्याने के ला जातो. त्यामुळे यात गायक-गायिका, संगीतकार अगदी त्या चित्रपटातील कलाकारांचीही नावं असतात. यु-टय़ूबवर गाण्याखालची माहिती शोधत गेलात तर खाली कु ठेतरी कधीतरी गीतकाराचा उल्लेख आढळतो. या प्राधान्यक्रमात गीतकाराचं नावच नसणं हे दुर्दैवी आहे. गाण्याला साज चढवणारा संगीतकार, आवाज देणारा गायक हे सगळे लोकांसमोर येतात आणि मुळात ज्याने ते बोल लिहिले तो घरातच कु ठेतरी बसून असतो. बोलच नसते तर ते गाणं झालंच नसतं हे साधंसरळ असूनही याचा विचार के ला जात नाही. ही समस्या कित्येक वर्षांची आहे आणि त्याविरोधात सगळ्यांनी मिळून ठामपणे आम्हाला श्रेय दिलंच पाहिजे हे सांगितलं पाहिजे. हिंदीतील गीतकारांनी एकत्र येऊन गाण्यातून हा प्रयत्न के ला असला तरी आपले श्रेय हे असे भाबडेपणाने मागण्याचा मुद्दा नाही, असं मला वाटतं.

क्षितिज पटवर्धन