सध्याच्या घडीला आंतरराष्ट्रीय क्रीडा विश्वात विशेषत: क्रिकेट जगतात गाजणारे एक नाव म्हणजे विराट कोहली. अवघ्या काही वर्षांतच विराटने क्रिकेट जगतात आपल्या कामगिरीच्या बळावर नावलौकिक मिळवले. सध्याच्या घडीला अनेकांसाठीच तो प्रेरणास्त्रोत ठरत आहे. अशा या खेळाडूला भेटण्याची संधी ‘मिस वर्ल्ड’ मानुषी छिल्लरला मिळाली. ‘सीएनएन-आयबीएन इंडियन ऑफ द इयर २०१७’ पुरस्कार सोहळ्यामध्ये मानुषी आणि विराटची भेट झाली.

यावेळी त्या दोघांनी स्टेजही शेअर केला. या कार्यक्रमात मानुषीला विराटसोबत संवाद साधण्याचीही संधी मिळाली. तिने या संधीचं सोनं करत विराटला एक महत्त्वाचा प्रश्न विचारला. ‘आज संपूर्ण जगात तू पट्टीचा फलंदाज आहेस. अनेकांसाठीचं प्रेरणास्थान आहेस. मुख्य म्हणजे समाजाप्रती तुझी जबाबदारीही तू पूर्ण केली आहेस. हल्लीची युवा पिढी तुझ्यापासून प्रेरणा घेतेय. त्यामुळे या युवा पिढीला, विशेषत: क्रिकेट जगतात करिअर करणाऱ्या मुलांना तू काय सांगू इच्छितोस?’, असा प्रश्न मानुषीने त्याला विचारला.

तिच्या या प्रश्नाचं उत्तर देत विराट म्हणाला, ‘तुम्ही आयुष्यात जे काही करता, ते अगदी मनापासून असावे. अगदी मैदानावरील खेळसुद्धा मनापासून खेळलेला असावा. असे न केल्यास तुम्ही दिखावा करत असल्याचे लगेच हेरलं जाते आणि अशा परिस्थितीत चाहत्यांशी कोणत्याच प्रकारचे नाते जोडले जात नाही. मी कधीही कोणाचीच नक्कल केली नाही, कोणासारखे होण्याचा प्रयत्न केला नाही. मी फक्त स्वत:लाच जगासमोर मांडण्याचा प्रयत्न करत आलो. मीसुद्धा काही अडचणींचा सामना केला. पण, ज्यावेळी माझ्यात बदल घडवून आणण्याची गरज असल्याचे माझ्या लक्षात आले तेव्ही मी मागे वळून पाहिलं नाही. स्वत:मध्ये बदल घडवून आणत असताना एक गोष्ट सर्वांनी ध्यानात ठेवली पाहिजे ती म्हणजे, तुमच्यातला खरेपणा जपण्याला प्राधान्य द्या.’

वाचा : जाणून घ्या मिस वर्ल्ड मानुषी छिल्लरचा ‘डाएट प्लॅन’

आपल्यातील खरेपणा जपा हा मुद्दा अधोरेखित करत विराट पुढे म्हणाला, ‘ज्यावेळी तुम्ही इतरांची नक्कल करण्याचा प्रयत्न करता, तेव्हा तुम्ही कधीच इतरांचे प्रेरणास्त्रोत होऊ शकत नाही. किंबहुना असे करुन तुम्ही कधीच यशस्वीही होऊ शकत नाही.’ सतत प्रयत्न करत राहा, हा मंत्रही विराटने युवा पिढीला दिला. त्याच्या या उत्तराने फक्त मानुषीचेच नाही तर नेटकऱ्यांचीही मनं जिंकली आहेत.