अभिनेता सुशांतसिंह राजपूतच्या बहिणींवर अभिनेत्री रिया चक्रवर्ती हिने केलेले आरोप मुख्यत्वे अनुमानावर आधारित आहेत. अनुमानांच्या आधारे गुन्हा दाखल केला जाऊ शकत नाही आणि एकाच घटनेसाठी दोन गुन्हे दाखल होऊ शकत नाहीत. त्यामुळे मुंबई पोलिसांनी गुन्हा दाखल करायला नको होता, असा दावा केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) प्रतिज्ञापत्राद्वारे बुधवारी उच्च न्यायालयात केला.

सुशांतला डॉक्टरांच्या बनावट चिठ्ठीच्या आधारे औषधे दिल्याच्या आरोपप्रकरणी त्याच्या बहिणी प्रियांका आणि मीतू सिंह यांच्याविरोधात रियाने वांद्रे पोलिसांत तक्रार नोंदवली होती. त्यानंतर पोलिसांनी दोघींसह दिल्लीस्थित डॉक्टरवर गुन्हा दाखल केला होता. प्रियांका आणि मीतू यांनी गुन्हा रद्द करण्याच्या मागणीसाठी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. त्यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करणारे प्रतिज्ञापत्र सीबीआयने बुधवारी उच्च न्यायालयात सादर केले.

मुंबई पोलिसांनी प्रियांका आणि मीतूवर अनुमानाच्या आधारे दाखल केला आहे. पोलिसांनी रियाच्या तक्रारीवर थेट गुन्हा दाखल करण्यापूर्वी प्राथमिक चौकशी करायला हवी होती, असा दावा सीबीआयने प्रतिज्ञापत्राद्वारे केला आहे. सुशांतच्या वडिलांनी त्याच्या मृत्यूप्रकरणी रिया आणि तिच्या कुटुंबीयांविरोधात केलेल्या तक्रारीचा किंबहुना त्याच्या मृत्यूशी संबंधित सगळ्या शक्यतांचा तपास आम्ही करत आहोत. त्यामुळे मुंबई पोलिसांनी रियाच्या तक्रारीवर गुन्हा दाखल करण्याऐवजी ती आमच्याकडे वर्ग करायला हवी होती, याकडे सीबीआयने न्यायालयाचे लक्ष वेधले.

एकाच घटनेसाठी दुसऱ्यांदा गुन्हा नोंदवणे हे कायद्याने मान्य नाही आणि तसे करणे चुकीचे असल्याचे सीबीआयने म्हटले. सुशांतला बनावट औषधांची चिठ्ठी पाठवल्याची बाब रियाला माहीत होती तर तिने सप्टेंबपर्यंत त्याबाबत मौन का बाळगले, असा प्रश्नही सीबीआयने उपस्थित केला आहे.