‘बायोस्कोप प्रॉडक्शन’चे राजेश व्यास यांनी शाहीद कपूरची आई  निलीमा आझीमवर अंधेरी महानगर न्यायालयात ४२०, ४०६ आणि ५०६ या कलमांखाली याचिका दाखल केली आहे.
व्यास यांचे वकील नीरज गुप्ता यांच्या म्हणण्यानुसार, २००९ साली व्यासनिर्मित करीत असलेल्या चित्रपटासाठी  निलीमाची लेखक, दिग्दर्शक आणि नृत्य दिग्दर्शक म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. या कामासाठी तिला एकूण ६३ लाख रूपये देण्याचे ठरले होते, ज्यातील रूपये १६ लाख चेक आणि रोख रक्कम स्वरुपात देण्यात आले होते
नीरज गुप्ता पुढे म्हणाले,  निलीमाने इमरान हाश्मी आणि प्रियांका चोप्राला चित्रपटासाठी करारबद्ध करण्याचे आश्वासन दिले होते. नंतर हे दोघेही चित्रपटात काम करण्यास तयार नसल्याचे तिने कळवले आणि मुलगा शाहीद कपूर या चित्रपटात काम करेल, असे सांगितले. परंतु, शाहीदने देखील यासाठी नकार दिला. यानंतर तिने चित्रपटासाठी चांगले कलाकार आणण्याचे पुन्हा एकदा आश्वासन दिले. परंतु करारानुसार ठरलेली बांधिलकी टिकविण्यास ती असमर्थ ठरली. त्याचप्रमाणे, या कामासाठी दिलेले पैसे परत करण्यास तिने नकार दिला. या सर्व प्रकाराबाबत आमच्या अशिलाने अंबोली पोलिस चौकीत संपर्क साधला. परंतु, पोलिसांकडून कोणतीही कारवाई न झाल्याने आम्ही अंधेरी महानगर न्यायालयात याचिका दाखल केली आणि याचिकेची सुनावणी १२ जून रोजी आहे.
निलीमा आझीमला रोख रक्कम आणि चेकद्वारे पैसे दिल्याचा आणि त्याचे सर्व तपशील आपल्या अशिलाकडे असल्याचा नीरज गुप्ता यांचा दावा आहे. राजेश व्यास यांच्या आत्तापर्यंतच्या चित्रपटांविषयी विचारणा केली असता नीरज गुप्तांकडे याबाबत काही माहिती नव्हती.
गुगलवर ‘बायोस्कोप प्रॉडक्शन’ चा शोध घेतला असता एका न्यूयॉर्कस्थित वेबसाईटची माहिती मिळते, जिचा बॉलिवूडशी काहीही संबंध दिसत नाही. राजेश व्यास यांच्या बॉलिवूड संबंधाची देखील काहीही माहिती मिळत नाही.