मराठी मुलींनी गुजराती, उत्तरप्रदेशी किंवा दाक्षिणात्य मुलाशी विवाह करून संसार थाटणे ही गोष्ट तशी नवीन राहिलेली नाही. मात्र, आपल्या मनासारखा जोडीदार निवडताना प्रांत, भाषा, संस्कृती पलीकडे जात विचार करणारी तरुणी प्रत्यक्ष विवाह करून जेव्हा नव्या घरात जाते. तेव्हा दोन संस्कृतींचा हा मिलाफ साधताना नेमके काय होते? भिन्न जीवनशैली, विचारसरणी असलेली दोन्ही घरांची माणसे हळूहळू एकत्र येण्याची, एक होण्याची ही प्रक्रिया अनुभवण्याची संधी ‘झी मराठी’वरील ‘काहे दिया परदेस’ या मालिकेच्या निमित्ताने मिळणार आहे.
‘झी मराठी’वर गेली दोन वर्ष लोकप्रिय ठरलेली ‘का रे दुरावा’ ही मालिका या आठवडय़ात प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. त्याच्या जागी ‘काहे दिया परदेस’ ही हिंदी नाव घेतलेली मराठी मालिका दाखल होते आहे. या मालिके ची कथाच अशी आहे की त्यासाठी हिंदी नावच समर्पक ठरले असते. मुंबईत शिकण्याच्या-नोकरीच्या निमित्ताने स्थायिक झालेला वाराणसीचा तरुण आणि त्याच्या प्रेमात पडून त्याच्याशी विवाह करणारी गौरी ही मराठी मुलगी यांची कथा ‘कोहे दिया परदेस’मधून पहायला मिळणार आहे, अशी माहिती ‘झी मराठी’चे कार्यक्रम प्रमुख दीपक राजाध्यक्ष यांनी दिली. या मालिके निमित्ताने भाषा, सीमा, प्रांत यांच्या कक्षा ओलांडून जाणारी ही पहिली मालिका ठरणार आहे, असा दावा दीपक राजाध्यक्ष यांनी केला. मालिकेत नायक वाराणसीतील स्थायिक कुटुंबातील दाखवला असल्याने त्याचे काही चित्रीकरण हे वाराणसीत करण्यात आले असून काही भाग मुंबईत चित्रित झाला असल्याची माहिती त्यांनी दिली.
‘काहे दिया परदेस’ मालिकेतून हर्ष सक्सेना आणि सायली संजीव ही नवीन जोडी प्रेक्षकांसमोर येते आहे. सायली संजीव हिने याआधी ‘पोलीस लाइन’ चित्रपटातून काम के ले असले तरी छोटय़ा पडद्यावरचे हे तिचे पहिले मोठे पदार्पण आहे. हर्ष सक्सेना हा हिंदी कलाकार पहिल्यांदाच मराठीत काम करतो आहे. त्याने याआधी एकता कपूरच्या मालिकांमधून काम के ले आहे. या मालिकेत मराठी आणि हिंदी भाषिक अशी दोन कुटुंबे प्रामुख्याने प्रेक्षकांसमोर येणार आहेत. मराठी कलाकारांना हिंदी संवाद म्हणायला लावून त्यांना वाराणसीतील कुटुंब म्हणून समोर आणणे योग्य वाटले नसते. म्हणून या मालिकेत हिंदी कलाकारांबरोबरच काम करण्याचा निर्णय घेतल्याचे राजाध्यक्ष यांनी सांगितले. त्यामुळे या मालिकेत पहिल्यांदाच हिंदी कलाकार मराठीत काम करताना दिसणार आहेत. सध्या नवीन मालिका आणताना आपल्या समाजाचे प्रतिबिंब ज्या कथांमध्ये उमटेल, अशा कथा प्रेक्षकांमसमोर आणण्याचा आपला मानसही त्यांनी बोलून दाखवला.
‘काहे दिया परदेस’ ही मालिका मराठी आणि वाराणसी या दोन शहरातील संस्कृतींना एकत्र आणणारी आहे. ‘वसुधैव कुटुंबकम्’ या ‘झील’ समूहाच्या ब्रीदवाक्याशी जोडून घेणारे, हे विश्वची माझे घर असे ज्ञानेश्वरांनी म्हटले आहे. त्याचे प्रत्यंतर आज आपण समाजात पाहतो. मात्र, आता हा विचार या मालिकेच्या माध्यमातून मांडण्याचा आपला प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले.