संरक्षणासाठी केला जाणारा खर्च पाच टक्क्यांनी कमी करा, वाटल्यास एक बॉम्ब कमी तयार करा, पण महिलांना सॅनिटरी नॅपकिन मोफत द्या, असे विधान अभिनेता अक्षय कुमारने केले आहे. अक्षयचा आगामी ‘पॅडमॅन’ हा चित्रपट २५ जानेवारी रोजी प्रदर्शित होत आहे. याच चित्रपटाच्या प्रमोशनसाठी पुण्यात आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात त्याने हे वक्तव्य केले. त्याचप्रमाणे सॅनिटरी पॅड करमुक्त नाही तर मोफत द्यावे अशी मागणी यावेळी त्याने केली.

‘सॅनिटरी पॅड करमुक्त व्हावा अशी महिलांची मागणी आहे, पण माझ्या मते सॅनिटरी पॅड मोफतच द्यावे,’ असे अक्षय म्हणाला. त्याच्या आगामी चित्रपटात महत्त्वाचा मुद्दा अधोरेखित करण्यात आला आहे. ‘पॅडमॅन’ हा चित्रपट अरुणाचलम मुरुगानंदम यांच्या जीवनावर बेतलेला आहे. ग्रामीण भागातल्या स्त्रियांसाठी स्वस्त दरात सॅनिटरी नॅपकिन बनवणाऱ्या यंत्राची निर्मिती अरुणाचलन यांनी केली.

वाचा : ‘पद्मावत’च्या मदतीला सरसावणार केंद्र सरकार?

या चित्रपटाच्या ट्रेलर, पोस्टर्स आणि गाण्यांना प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळत आहे. आर. बाल्की दिग्दर्शित या चित्रपटात अक्षयसोबतच राधिका आपटे आणि सोनम कपूर यांच्याही मुख्य भूमिका आहेत. २५ जानेवारी रोजी प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटाची टक्कर संजय लीला भन्साळी यांच्या ‘पद्मावत’ होणार आहे. या दोन्ही चित्रपटांबद्दल प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता पाहायला मिळत असून सर्वाधिक कमाई करण्यात कोण बाजी मारेल हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.