करोना या संसर्गजन्य आजाराचा मुकाबला करत असतानाच एका नैसर्गिक संकटानं महाराष्ट्राच्या दारावर थाप मारली आहे. अरबी समुद्रात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्याचे मंगळवारी दुपारी चक्रीवादळात रुपांतर झाले. या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे तयार झालेले निसर्ग चक्रीवादळ दुपारी दमण आणि हरिहरेश्वरच्या दरम्यान अलिबागजवळ धडकण्याची भीती व्यक्त करण्यात आहे. यामुळे संपूर्ण किनारपट्टीवर मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. मुंबईबरोबरच महाराष्ट्राच्या किनारपट्टीवरील सर्व भागांमध्ये सतर्कतेचा इशाराही देण्यात आला आहे. दरम्यान, वादळाआधीच मंगळवारी रात्रीपासून किनारपट्टी भागात अनेक ठिकाणी पावसाने हजेरी लावली. मुंबई, ठाण्यामध्ये मंगळवार रात्रीपासूनच पावसाने चांगलाच जोर धरला आहे. याच पार्श्वभूमीवर मुंबईतही सावधानतेचा इशारा म्हणून अनेक उपाययोजना करण्यात आल्या आहेत. या वादळाचा फटका मुंबईला बसणार असल्याबद्ल अमेरिकेत राहणारी अभिनेत्री प्रियांका चोप्रानेही चिंता व्यक्त केली आहे. तिने ट्विटवरुन यासंदर्भात आपली प्रतिक्रिया दिली आहे.

“चक्रीवादळ मुंबईच्या दिशेने वाटचाल करत आहे. या शहरामध्ये दोन कोटी लोकं राहतात. माझी आई आणि भाऊही याच शहरात राहतो. १८९१ पासून कोणतेही मोठे वादळ मुंबईला धकडकलेले नाही. आणि आता या वेळी जेव्हा जगभरामध्ये (करोनाचे) संकट आहे तेव्हा हे वादळ आल्याने मोठा फटका बसेल. हे वर्ष अत्यंत कठोर आहे. कृपया सर्वांनी निवाऱ्याची व्यवस्था करा. काळजी घ्या आणि यंत्रणांनी दिलेल्या नियमांचे पालन करा. सर्वांना सुरक्षित राहा,” असं प्रियांकाने दोन ट्विटमध्ये म्हटलं आहे. या ट्विटबरोबर तिने मुंबई महानगरपालिकेने वादळाच्या काळात काय करावे आणि काय करु नये यासंदर्भातील सूचनांचे फोटोही पोस्ट केले आहेत.

लोकप्रिय हिंदी -पंजाबी गायक गुरु रंधावानेही ट्विटवरुन या सूचनांसंदर्भातील फोटो ट्विट करत, “या संकटाच्या काळात एकमेकांची काळजी घेऊयात,” असं आवाहन केलं आहे.

मुंबईबरोबरच या वादाळाचा फटका राज्यातील अन्य महत्वाच्या शहरांनाही बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. यामध्ये प्रामुख्याने ठाणे, पालघर, मुंबई, रायगड, धुळे, नंदुरबार, नाशिक आणि पुणे जिल्ह्य़ांना काही ठिकाणी अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. तर रत्नागिरी, सिंधुदुर्ग, जळगाव आणि अहमदनगर जिल्ह्य़ात काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे.