तरुणाईसह अनेक प्रेक्षकांची अमाप लोकप्रियता लाभलेल्या ‘दिल, दोस्ती, दुनियादारी’चा दुसरा सीझन सुरू होतोय. ‘दोबारा’ सुरू होणाऱ्या मालिकेबद्दल ‘कट्टा गँग’ला काय वाटतं, ते जाणून घेऊ या..

मॅरेथॉनमध्ये भाग घ्यावा तशा रीतीनं मी कट्टय़ाकडं निघाले.. हा होता कॉलेजमधला कट्टा. हो आजकाल माणसानं कसं स्पेसिफिक असावं अशी अपेक्षा असते बाकीच्यांची. तर आमचं मराठीच्या इतिहासाचं शेवटचं लेक्चर संपल्यावर मी निघाले, तर भोवतालून दोन-तीनदा बारीकशा आवाजात एक टय़ूून ऐकू येत होती. फार फार ओळखीची होती, पण चटकन रिलेट होत नव्हती. त्यामुळं भासच असेल तो असं मनात म्हणत ती टय़ून कानामागं टाकत मी पुढं चालू लागले. कट्टय़ापाशी पोहोचता पोहोचता गिटारवरची एक टय़ूून कानी आली.. ‘‘यारों दोस्ती..’’ वाटलं आईऽऽशप्पथ्थऽऽ.. आपलं काही खरं नाही.. काय नसते नसते भास होऊन राहिलेत आपल्याला.. मग स्वत:लाच समजावलं की, ‘‘देख बहिणाबाई, नुकतंच प्रोजेक्ट सबमिशन झालं असेल किंवा परीक्षा संपली असेल तर हे असं होऊच शकतं..’’ पण..
पणबिण काही नाही.. गिटारची टय़ून खरोखरच वाजत होती. गिटारिस्ट होती किमया! बाकी गँग तिला टाळ्या वाजवून डोलून प्रतिसाद देत होती. टय़ूून पुरी करून किमया थांबली नि माझीही मॅरेथॉन संपली. धापा टाकत मी खूण केली ‘‘काय आहे हे?’’ हे विचारलं मात्र सगळी जनता माझ्यावर तुटूनच पडली. तुंबळ शाब्दिक धुमश्चक्रीच झाली म्हणा ना.. होऽऽ होऽऽ आता मराठीचा इतिहास शिकणारीनं एवढे मराठी शब्द वापरायचा अधिकार मिळवलेला असतो. तर त्या शाब्दिक हल्ल्यातून माझ्या कानापर्यंत पोहचलेले शब्द होते ‘वेडी कुठली’, ‘मूर्ख’, ‘लेटकरंट’, ‘मॅडचॅप’ वगरे वगरे. आमच्या गँगचे काही खासे शब्द तुम्हाला न सांगता राखीव कोटय़ातच ठेवते. शेवटी सगळ्यांवर आवाज चढवून शौनक म्हणाला की, ‘‘अगं तुला काही माहितीबिहिती असतं की नाही. कोणत्या जगात वावरतेस राव?’’ आता हे बाकी खरंय की परीक्षा-प्रोजेक्टस् या काळात मी अज्ञातवासात जाते. म्हणजे सोशल मीडिया बंद. अगदी पेपरबिपर नि टीव्हीबिव्ही पण अजिबात बघत नाही. तितक्यात मला भानावर आणत प्रिया म्हणाली, ‘‘हेऽऽऽ तुला माहीत नाही ‘डीथ्री’ सुरू होतंय..’’ मी म्हटलं ‘‘हो, पण..’’

पणबिण काही नाही.. किमयानं गिटार म्यान करत म्हटलं की, ‘‘अगं असं काय करतेस ‘दिल दोस्ती दोबारा’ सुरू होतंय उद्यापासून..’’  किमयाचं वाक्य संपत नाही तोच ‘डीथ्री’चा हार्डकोअर फॅन जागृतावस्थेत आला.. ‘‘मुली, ‘डीथ्री’ सुरू होतंय. त्यात सुव्रत, अमेय, स्वानंदी, सखी, पुष्कराज आणि पूजा ही पहिली टीम आहेच. पण आणखी दोन जणांची त्यात भर पडणारेय,’’ इति राजस गुरुजी उवाच. ‘‘हो ना, कोण असतील दुसरे दोघं?’’.. आमच्या गँगचं प्रश्नचिन्हं अर्थात सानिया पुटपुटली.. त्यावर या नव्या भागांचं दिग्दर्शन अव्दैत दादरकर करणार आहे, या वेळचा सेट लई भारी आहे, तो ‘कवटीचा फोन’ ही कुणाच्या आयडियाची कल्पना असेल?.. ‘डीथ्री’ गँगचं आतापर्यंतचं मोस्ट फेव्हरेट लोकेशन असणारं ‘माजघर’ बदलणार का, ते हॉटेल असेल की फक्त प्रोमोपुरतं तसं दाखवत असतील?.. असे वेताळालाही पडले नसतील, इतके प्रश्न गँगमध्ये सगळ्यांना पडत होते. मी पुन्हा नेट लावून बोलायचा प्रयत्न केला की, ‘‘पण मी काय म्हणते..’’

पणबिण काही नाही.. गँग मला बोलूच देईना. खरोखर मंडळी, आमची गँग म्हणजे ‘डीथ्री’चं प्रतििबबच म्हणायला हवी. अर्थात सगळ्याच यंगस्टर्सना ही मालिका बघितल्यापासून तस्सं वाटत असावं. म्हणून तर या मालिकेच्या नावानं ‘फेसबुक पेजेस’ सुरू झालीत. ‘व्हॉटस्अ‍ॅप ग्रुप’चं नामकरण ‘डीथ्री’ किंवा त्याच प्रकारचं केलं गेलंय. त्यातही अनेक जणं या मंडळींना फारच फॉलो करतात. म्हणजे केवळ मज्जा-मस्ती न करता त्यांच्या परीनं होईल तेवढं नि अर्थात खिशाला सोसेल तेवढं सोशल वर्क करतात. तशा प्रकारचे किती तरी लेख छापूनही आले होते. टीम ‘डीथ्री’सारखं वागणं-बोलणं, स्टाईल स्टेटमेंटस् इतकंच कशाला, त्यांच्या माजघरातल्या काचेच्या ग्लासनाही भारीच ग्लॅमर मिळालं होतं.. अजूनही असावं.. आमच्याच ग्रुपचं सांगायचं तर किमयाला ‘कैवल्य’सारखी गिटार शिकाविशी वाटली. राजसवर ‘सुजय’ची अधिक छाप असल्यानं तो लर्न अ‍ॅण्ड अर्न करू लागला. प्रिया आणि ‘अ‍ॅना’ या जुळ्या बहिणी असाव्यात, इतकं साम्य त्यांच्यात आहे. अर्थात दिसण्यात नव्हे तर प्रियालाही अ‍ॅनासारखं आर्ट आवडतं. आमचा दादा अर्थात ‘आशू’ आहे शौनक आणि ‘मीनल’ आहे सानिया. मी स्वत:ला ‘रेश्मा’शी बऱ्याचदा रिलेट करते. आम्ही त्यांच्यासारखे एकत्र राहात नसलो तरीही आम्ही कायमच एक आहोत. ‘दोस्ती, दिलदारी आणि दुनियादारी’ या ‘थ्रीडीं’नी आमच्या कॉलेज लाइफचे रंग आणखीन रंगीन केलेत. त्यामुळं.. ‘‘हेऽऽऽ तुला काय झालंय काय?..’’ प्रियानं मला गदागदा हलवलं.. पण बोलू दिलं नाही..

पणबिण बाजूला ठेवून मीही हट्टाला पेटले. सगळ्यांच्या वरताण आवाज चढवला थोडासा, त्या ‘मीनल’टाइप्स. होऽऽऽ होऽऽऽ आम्ही आमच्या भूमिकांना मुळीच घट्ट धरून ठेवत नाही. अनेकदा त्यांत अदलाबदल होत असतेच. तर मग मी बोलू लागले की, ‘‘लोक्स, जरा शांतपणं घ्या. मला लक्षात आलंय की, तुम्हांला सगळ्यांना काय म्हणायचं ते. पण, मग, परंतु.. मला असं सांगायचं की, मी ‘त्यांच्या सेट’वर जातेय.. त्यांची मुलाखत घ्यायला..’’ वाक्य संपतासंपताच मला जाणवलं की, कट्टे पे भारी सन्नाटा छा गया हैं.. भले हा ‘डीथ्री इफेक्ट’ होता, पण तरीही ऐन फेब्रुवारीत ‘एप्रिलफुल्ल’ची शंका सगळ्यांच्याच मनात डोकावून गेली होती. मग खुलासा करत मी म्हटलं की, ‘‘बाबांनो, मी थोडंफार लिहिते, हे तर तुम्हाला माहिती आहेच. म्हणूनच आमच्या सरांनी आमच्या टीमपकी मला सिलेक्ट केलंय ‘डीथ्री टीम’च्या मुलाखतीसाठी. सो मला परवा जायचंय तिकडं. या अभ्यासाच्या नादात ते सांगायचं राहून गेलं तुम्हाला.. सॉरी.. मी सांगणारच होते पण..’’

पणबिण काही नाही.. ‘‘एक पार्टी तो बनतीही हैं इस बात में..’’  एवढं प्रियाचं वाक्य पुरं होतंय न होतंय तोच शौनकनं ते पटकन उचलून धरलं. सानियानं चटकन मिठी मारून मला काँग्रॅट्स केलं. राजसनं ‘गुड’ अशा अर्थी अंगठा दाखवला नि पर्समध्ये पसे आहेत ना? असं विचारत स्वत:चं क्रेडिट कार्ड दाखवलं. किमया बोलली काहीच नाही, पण तिनं ‘म्यान केलेलं’ गिटार बाहेर काढलं.. गेटपर्यंत चालता चालता टय़ूून सेट होत होती.. गेटशी आलो नि ‘ती’ प्रसिद्ध टय़ूून किमयानं वाजवली.. अर्थात आता ‘दोबारा’त कदाचित वेगळी टय़ूून असेलही पण आमच्या गँगचं सध्याचं ‘ग्रुपसाँग’ तेच तर होतं..

‘‘दिल, दोस्ती, दुनियादारी..’’

response.lokprabha@expressindia.com
सौजन्य – लोकप्रभा