‘दबंग ३’ मध्ये भूमिका साकारलेला अभिनेता जावेद हैदर याचा भाजी विकतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला. लॉकडाउनमुळे शूटिंग बंद असल्याने जावेदवर भाजी विकण्याची वेळ आली का, असा प्रश्न नेटकऱ्यांना पडला. मात्र या व्हिडीओवर जावेदने आता स्पष्टीकरण दिलं आहे. मी पैशांसाठी भाजी विकत नव्हतो तर मनोरंजनासाठी व्हिडीओ शूट करत होतो, असं त्याने म्हटलंय.

‘टाइम्स ऑफ इंडिया’ला दिलेल्या मुलाखतीत तो म्हणाला, “मी भाजी विकत नाहीये. लॉकडाउनदरम्यान स्वत:ला कोणत्या ना कोणत्या कामात व्यग्र ठेवण्यासाठी मी काही व्हिडीओ शूट केले होते. माझ्या मुलीने मला त्यासाठी प्रोत्साहित केलं. प्रत्येकाच्या आयुष्यात काही ना काही समस्या आहेत, लॉकडाउनमुळे अनेकांसमोर आर्थिक उत्पन्नाचा प्रश्न निर्माण झालाय, काही जण आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचलतायत. अशा परिस्थितीत थोडंफार लोकांचं मनोरंजन करता यावं यासाठी मी तो व्हिडीओ शूट केला होता. भाजीविक्रेत्याची परवानगी घेऊन मी त्याच्या गाडीसोबतच छोटा व्हिडीओ शूट केला. तो व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला.”

आर्थिक संकटात नसल्याचं जावेदने या मुलाखतीत स्पष्ट केलं. जमा केलेले पैसे लॉकडाउनदरम्यान कामी येत असल्याचं त्याने सांगितलं. जावेदने ‘खुदगार’ आणि ‘राम जाने’ यांसारख्या चित्रपटात बालकलाकार म्हणून कामाला सुरुवात केली. त्याने आमिर खानच्या ‘गुलाम’ चित्रपटातही भूमिका साकारली होती.