दिलखूलास अंदाज, हटके स्टाइल आणि गावगुंडांना धाकात ठेवण्याची अनोखी पद्धत या साऱ्यामुळे प्रेक्षकांची ज्याने मने जिंकली तो चुलबूल पांडे पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. अभिनेता सलमान खानची मुख्य भूमिका असलेला दबंग फ्रेंचाईजीमधील तिसरा भाग लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘दबंग २’ नंतर तब्बल सात वर्षांनी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत असल्यामुळे चाहत्यांमध्ये या चित्रपटाविषयी प्रचंड उत्सुकता आहे. आता या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख समोर आली आहे.

बॉलिवूडचा दबंग खान सलमानने ट्विटद्वारे ‘दबंग ३’ची तारीख प्रदर्शित केली आहे. ‘२० डिसेंबर २०१९ रोजी चुलबूल पांडे तुमच्या भेटीला येणार आहे. हा चित्रपट हिंदी, तमिळ, तेलुगू आणि कन्नडमध्ये प्रदर्शित होणार आहे’ असे सलमानने ट्विटमध्ये लिहिले आहे. चाहत्यांसाठी हा सुखद धक्काच असणार आहे.

‘दंबग ३’ हा प्रिक्वल असून यात चुलबूल पांडेची कौटुंबिक पार्श्वभूमी दाखवण्यात येणार असल्याच्या चर्चा आहेत तर दुसरीकडे हा चित्रपट नोएडामधल्या एका पोलीस अधिकाऱ्याच्या जीवनातील सत्य घटनांवर आधारित असल्याचेही म्हटले जात आहे. प्रभुदेवा दिग्दर्शित सलमान खानचा हा चित्रपट २० डिसेंबर २०१९ रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात सलमानसह अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा मुख्य भूमिकेत असून महेश मांजरेकर यांची मुलगी सई मांजरेकर सलमानच्या कॉलेज जीवनातील प्रेयसीची भूमिका साकारणार आहे. या चित्रपटातून सई बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे.