गेल्या ३६ वर्षांपासून विविध चित्रपट पडद्यावर दाखवून प्रेक्षकांचं मनोरंजन करणारे चित्रा सिनेमागृह लवकरच बंद होणार आहे. अभिनेता टायगर श्रॉफचा काही दिवसांपूर्वीच प्रदर्शित झालेला ‘स्टुडंट ऑफ द इअर २’ या चित्रपटाचा शेवटचा शो या सिनेमागृहात दाखविला जाणार आहे. ५५० आसन असलेलं हे सिनेमागृह आज (गुरुवारी) बंद होणार आहे.

‘मिड डे’च्या वृत्तानुसार, आज रात्री ‘स्टुडंट ऑफ द इअर २’ या चित्रपटाचा शेवटचा शो या सिनेमागृहात दाखविला जाईल. ३६ वर्षांपासून सुरु असलेल्या या सिनेमागृहाची धुरा पी.डी मेहता यांच्या मुलाने दारा मेहता यांनी सांभाळली होती. मात्र प्रेक्षकांचा अल्पप्रतिसाद आणि आर्थिक चणचण जाणवत असल्यामुळे हे सिनेमागृह बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

“१९६१ साली प्रदर्शित झालेला शम्मी कपूर यांचा ‘जंगली’ हा चित्रपट त्याकाळी प्रचंड गाजला होता. विशेष म्हणजे या चित्रपटाने या सिनेमागृहाचे तब्बल २५ आठवडे गाजविले होते. त्याकाळी या चित्रपटगृहाकडे मराठी प्रेक्षक वर्गाचा ओघ जास्त होता. मात्र कालांतराने या चित्रपटगृहाला प्रेक्षकांचा अल्पप्रतिसाद मिळू लागला आणि आर्थिक चणचणही जाणवू लागली याच कारणास्तव हे सिनेमागृह बंद करण्यात येणार असल्याचं”, दारा मेहता यांनी सांगितलं.

१९८३ साली प्रदर्शित झालेला अभिनेता जॅकी श्रॉफचा ‘हिरो’ हा चित्रपट त्याकाळी प्रचंड गाजला होता. हा चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षकांनी चित्रा सिनेमागृहाजवळ प्रचंड गर्दी केली होती. त्यावेळी या सिनेमागृहात या चित्रपटाचे हाऊसफुल शो सुरु होते. विशेष म्हणजे जॅकी श्रॉफचा सिनेमा ज्या सिनेमागृहात सुपरहिट ठरला, त्याच जॅकी श्रॉफच्या मुलाचा म्हणजेच टायगर श्रॉफच्या सिनेमाचा आज शेवटचा शो येथे होणार आहे.