24 November 2020

News Flash

‘त्या’ अभिनेत्रीच्या शोधात दादासाहेबांनी जिवाचं रान केलेलं, पण…

'राजा हरिश्चंद्र' एक मैलाचा दगड ठरला खरा. पण, तो साकारण्यासाठी दादासाहेबांच्या वाटेत आलेल्या अडचणी काही कमी नव्हत्या.

दादासाहेब फाळके

आज जगामध्ये आधुनिकीकरणाचे वारे वाहत असतानाच याच आधुनिकीकरणापासून कलाविश्वही दूर राहिलेले नाही. याचा प्रत्यय गेल्या काही वर्षांमध्ये आला आहे. चित्रपटविश्वाच्या कक्षा इतक्या रुंदावल्या आहेत, की आपल्या कल्पनाशक्तीला शह देत ही कलाकार मंडळी त्यांच्या कलेचा अद्वितीय नजराणा प्रेक्षकांसाठी सादर करत आहेत. अशा या कलाविश्वात भारतीय चित्रपटसृष्टीचं योगदानही अमूल्य आहे. आजवर हजारो कलावंत घडवणाऱ्या या चित्रपटसृष्टीची मुहूर्तमेढ एका मराठमोळ्या व्यक्तीच्या उत्तुंग कर्तृत्वाने रोवली गेली होती. ती व्यक्ती म्हणजे धुंडिराज गोविंद फाळके उर्फ दादासाहेब फाळके. (३० एप्रिल १८७०, त्र्यंबकेश्वर, महाराष्ट्र – १६ फेब्रुवारी १९४४ नाशिक, महाराष्ट्र)

भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दादासाहेबांच्या १४८व्या जयंतीनिमित्तं गुगलनेही त्यांना मानवंदना देत एक अप्रतिम डुडल साकारलं आहे. या डुडलमध्ये चित्रफित हातात घेतलेली दादासाहेबांची प्रतिकृती दिसत असून, कॅमेराआड असणारे दादासाहेब, कलाकारांना दृश्य समजावून सांगणारे दादासाहेब अशा त्यांच्या वेगवेगळ्या छवी पाहायला मिळत आहेत.

चित्रपटनिर्मिती करणारे महाराष्ट्रातील आणि भारतातील पहिले चित्रपटनिर्माते म्हणून त्यांची ओळख आहे. दादासाहेबांनी १९१३ साली ‘राजा हरिश्चंद्र’ चित्रपटाची निर्मिती करून भारतातील चित्रपट निर्मितीची मुहूर्तमेढ रोवली. त्यानंतर १९३७ पर्यंतच्या १९ वर्षांच्या कारकीर्दीत त्यांनी तब्बल ९५ चित्रपट आणि २६ लघुपटांची निर्मिती केली.

वाचा : जेव्हा चहा विक्रेत्याने पहिल्यांदाच आपल्या मुलांना नेलं मॅकडोनल्डमध्ये

कलाविश्वात ‘राजा हरिश्चंद्र’ एक मैलाचा दगड ठरला खरा. पण, तो साकारण्यासाठी दादासाहेबांच्या वाटेत आलेल्या अडचणी काही कमी नव्हत्या. लंडनमध्ये जाऊन त्यांनी चित्रपट निर्मितीतील काही महत्त्वाच्या गोष्टी शिकल्या ज्यानंतर मायदेशी परतून त्यांनी स्वत:ची चित्रपट निर्मिती संस्था स्थापन केली. ‘राजा हरिश्चंद्र’मध्ये स्त्री पात्र साकारण्यासाठी ते एका अभिनेत्रीच्या शोधात होते. पण, त्या काळात अभिनेत्री म्हणून एका महिलेची निवड करणं हे तितकं सोपं काम नव्हतं.

महिलांनी काम करणं हेच त्या काळात गैर समजलं जायचं. आपल्या महत्त्वाकांक्षी चित्रपटामध्ये अभिनेत्रीचा शोध घेण्यासाठी म्हणून दादासाहेबांनी बरीच शोधमोहिम केली. पण, त्यांना यातही अपयश आलं. बऱ्याच ठिकाणी त्यांनी आपल्या चित्रपटासाठीचं स्त्री पात्रं शोधण्याचा प्रयत्न केला. पण, काळ आणि तेव्हाची विचारसरणी या गोष्टी दादासाहेबांच्या वाटेत प्रत्येक वेळी नव्या अडचणी उभ्या करत होतं. अखेर एका भोजनालयामध्ये काम करणाऱ्या आण्णा साळुंखे यांना त्यांनी ‘राजा हरिश्चंद्र’मधील स्त्री पात्राची भूमिका करण्यासाठी निवडलं. या चित्रपटाशी निगडीत प्रत्येक लहानमोठ्या गोष्टीची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेत त्यांनी हे शिवधनुष्य पेललं. तीन वर्षे बरीच मेहनत घेतल्यानंतर ३ मे, १९१३ मध्ये ‘राजा हरिश्चंद्र’ प्रेक्षकांच्या भेटीला आला आणि तेव्हापासून या अविश्नसनीय दुनियेत नवी पहाट झाली असंच म्हणावं लागेल.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 30, 2018 10:08 am

Web Title: dadasaheb phalkes 148 birth anniversary google doodle remembers father of indian cinema
Next Stories
1 Photo: ‘रोडीज’ फेम रणविजय सनी लिओनीच्या जुळ्या मुलांच्या भेटीला
2 ‘बाहुबली’च्या चाहत्यांसाठी प्रभासचा खास संदेश
3 भन्साळींसोबत काम करण्यास पुन्हा एकदा ‘मस्तानी’ सज्ज?
Just Now!
X