सत्य घटनेवर आधारीत सिनेमांना नेहमीच लोकांनी पसंत केले. त्यातल्या त्यात एखाद्या व्यक्तीच्या जीवनावर आधारीत सिनेमांना तर अधिकच पसंती मिळालेले आपण पाहिले आहे. अशाच एका व्यक्तीमत्वावर आधारीत ‘डॅडी’ हा सिनेमा लवकरच येतोय. राजकीय नेते अरूण गवळी यांच्या जीवनावर हा सिनेमा आधारीत असून या सिनेमाची घोषणा नुकतीच ऑर्कीड हॉटेल मुंबई येथे करण्यात आली. यावेळी नेते अरूण गवळी यांच्या पत्नी आशा गवळी व त्यांची मुलगी गीता गवळी उपस्थित होत्या. या धमाकेदार सिनेमाचे एक विशेष आकर्षण म्हणजे सिनेमातील मुख्य भूमिका प्रसिद्ध अभिनेता अर्जून रामपाल करणार आहे.
‘डॅडी’ या सिनेमाची निर्मिती पेंटाग्राम फिल्म प्रा.लि. व सुनील माने एन्टरटेन्मेंट प्रा.लि. या दोन निर्मिती संस्थांनी संयुक्त विद्यमाने केली असून पेंटाग्राम फिल्म प्रा.लि चे मंदार दळवी यांनी सांगितले की, “आम्ही यावर्षी वेगवेगळ्या विषयांवरील सिनेमांची मोठ्या प्रमाणात निर्मिती करणार असून हिंदी सोबतच प्रादेशिक भाषांमधील सिनेमांच्या निर्मितीकडेही आम्ही विशेष लक्ष देणार आहोत”.
‘डॅडी’ सिनेमाचे दिग्दर्शन गौरव बावदनकर यांनी केले असून ते आत्तापर्यंत युके मध्ये फिल्ममेकर म्हणून काम करीत होते. याआधी त्यांनी अनेक जाहीराती, माहितीपट, म्युझिक व्हिडिओ आणि कॉर्पोरेट व्हिडिओचे काम केले आहे. यावेळी दिग्दर्शक गौरव बावदनकर यांनी सांगितले की, “गेली तीन वर्षे आम्ही या विषयावर रिसर्च करत होतो. फार मोठ्या कालावधीनंतर ज्याची आम्ही आतुरतेने वाट बघत होतो तो क्षण आला आहे”.