क्राइम ड्रामा हा सगळ्यांचा आवडता जॉनर आणि बॉक्स ऑफिसवरचा सुपरहिट फॉर्म्युला. आज हा जॉनर चित्रपटगृहात परतला आहे डॅडीच्या रूपाने. मराठी प्रेक्षकांसाठी आज प्रदíशत झालेला ‘डॅडी’ आणि ‘पोश्टर बॉइज’ हे दोन्ही चित्रपट जिव्हाळ्याचे विषय आहेत. गँगस्टर अरुण गवळीच्या आयुष्यावर आधारित असल्याने डॅडीविषयी एकूणच प्रेक्षकांमध्ये उत्सुकता आहे. तर याआधी मराठीत सुपरहिट ठरलेल्या पोश्टर बॉइजचा हिंदी रिमेक अभिनेता श्रेयस तळपदेने दिग्दíशत केला आहे. त्यामुळे या दोन्ही चित्रपटांसाठी उत्सुक असलेला प्रेक्षक चित्रपटगृहाकडे न वळला तरच नवल..

डॅडी

डॅडी याच नावाने ओळखल्या जाणाऱ्या गँगस्टर अरुण गवळीची कथा अशिम अहलुवालिया दिग्दर्शित ‘डॅडी’ या चित्रपटातून जिवंत झाली आहे. अर्जुन रामपाल या चित्रपटात अरुण गवळीची भूमिका करतो आहे. मात्र या वेळी अर्जुनची भूमिका एवढीच मर्यादित नाही. तर त्याने दिग्दर्शक अशिमबरोबर या चित्रपटासाठी पटकथा लेखनही केले आहे आणि तो या चित्रपटाचा सहनिर्माताही आहे. ऐंशीच्या दशकात दक्षिण मुंबईवर आपल्या दहशतीचे साम्राज्य उभारणाऱ्या अरुण गवळीचा कुख्यात गुंड रमा नाईक आणि बाबू रेशीम यांच्या भायखळा गँगमध्ये झालेल्या प्रवेशापासून ते दगडी चाळीतून सूत्रे हलवीत उभारलेले स्वत:चे साम्राज्य आणि त्यानंतरचा राजकारणात केलेला प्रवेश अशा मुंबईच्या टोळी इतिहासातील अनेक गोष्टींना या चित्रपटाच्या निमित्ताने उजाळा मिळणार आहे. यात बाबू रेशीमची भूमिका अभिनेता आनंद इंगळे यांनी तर रमा नाईकची भूमिका अभिनेता राजेश श्रुंगारपुरे याने केली आहे. दाक्षिणात्य अभिनेत्री ऐश्वर्या राजेश या चित्रपटात अरुण गवळीच्या पत्नीच्या आशाच्या भूमिकेत दिसणार आहे. याशिवाय, दिग्दर्शक निशिकांत कामत इन्स्पेक्टरच्या भूमिकेत आहे.

पोश्टर बॉईज

२०१४ साली प्रदíशत झालेल्या ‘पोश्टर बॉइज’ या मराठी चित्रपटाचा हा रिमेक आहे. त्या वेळी श्रेयस तळपदे या चित्रपटाच्या निर्मात्याच्या भूमिकेत होता. समीर पाटील दिग्दíशत या चित्रपटात श्रेयसने मुख्यमंत्र्यांची भूमिका केली होती. हिंदीत हा चित्रपट आणताना श्रेयसने दिग्दर्शन आणि अभिनय दोन्ही आघाडय़ा सांभाळल्या आहेत. मराठी चित्रपटात दिलीप प्रभावळकर यांनी केलेली भूमिका सनी देओलने केली आहे. हृषीकेश जोशीची भूमिका बॉबी देओलने तर अनिकेत विश्वासरावने साकारलेली भूमिका खुद्द श्रेयसने केली आहे. सोनाली कुलकर्णीनेही चित्रपटात काम केले आहे. पुरुष नसबंदीविषयी हलक्याफुलक्या पद्धतीने प्रबोधन करणारा हा चित्रपट हिंदीत नव्या कलाकारांबरोबर पाहणे रंजक ठरेल.

बॉईज

विशाल देवरुखकर दिग्दíशत ‘बॉइज’ हा चित्रपट बोìडग स्कूलमध्ये शिकणाऱ्या तीन मुलांभोवती फिरतो. सुमंत शिंदे, पार्थ भालेराव आणि प्रतीक लाड हे या तीन मुख्य व्यक्तिरेखांमध्ये आहेत. त्यांच्या जोडीला शिल्पा तुळसकर, संतोष जुवेकर, झाकीर हुसन, शर्वरी जमेनीस, वैभव मांगले, भाऊ कदम अशी मोठी कलाकार मंडळीही आहेत.

तुला काही कळणार नाही

स्वप्ना वाघमारे-जोशी दिग्दर्शित ‘तुला काही कळणार नाही’ हा चित्रपटही रॉमकॉमच्याच धाटणीचाच आहे. पती-पत्नीच्या नात्यातील ताणतणाव हा मराठी चित्रपटांचा सध्या चलतीचा विषय आहे. ‘तुला काही कळणार नाही’मध्येही हाच विषय नव्याने पाहायला मिळणार असून अभिनेता सुबोध भावे आणि अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांच्या यात महत्त्वाच्या भूमिका आहेत.

इट

स्टीफन किंगच्या १९८६ साली प्रकाशित झालेल्या ‘इट’ या कादंबरीवर आधारित हा थरारपट आहे. एकाच गावातील सात मुले लागोपाठ गायब होतात. या गायब होण्यामागे जे षड्यंत्र आहे त्याचा कर्ताकरविता एक विदूषक आहे. या कादंबरीवर याआधी छोटेखानी मालिका प्रदíशत झाली होती. आता हा चित्रपट करताना तो दोन भागांत करण्याची वॉर्नर ब्रदर्सची योजना होती. त्यापकी पहिला भाग आज ‘इट’ या नावानेच प्रदíशत झाला आहे.

बॉक्सऑफीस  : बादशाहो – ६०.५४ कोटी, शुभमंगल सावधान – २१.२९ कोटी, अ जेंटलमन – १७.१५ कोटी, बाबुमोशाय बंदूकबाज – ६ कोटी, टॉयलेट एक प्रेमकथा – १३०.२ कोटी