श्रावण सुरु झाल्यावर अनेक सणांची चाहूल लागते. त्यातच तरूणाईचा उत्साहसुद्धा पाहायला मिळतो. आपली संस्कृती जपण्यासाठी पुढे सरसावणाऱ्या या तरुणाईचा आवडता सण म्हणजे गोकुळाष्टमी. श्रीकृष्ण जन्माष्टमी आणि त्यानंतर होणारा दहिकाला असा दोन दिवस या सणाचा उत्साह पाहायला मिळतो. मुख्य म्हणजे तरुणांचा यात मोठ्या संख्येने सहभाग पाहायल मिळतो. अशा या सणाची लोकप्रियता पाहून चित्रपटसृष्टीनेही ही गोष्ट हेरली आणि चित्रपटांमध्ये प्रसंगानुरुप गोविंदांचा उत्साह दाखवला. आजवर बऱ्याच चित्रपटांमध्ये गोविंदाचा हा उत्साह विविध पद्धतींनी साजरा झाल्याचं पाहायला मिळालं आहे. पण, याची सुरुवात नेमकी कुठून झाली हे तुम्हाला ठाऊक आहे का?

हिंदी चित्रपटसृष्टीतील इतिहासाची पानं चाळली तर गोकुळाष्टमीचा सण साजरा झाल्याची आपण पाहिलं आहे. पण, गोपाळकाला आणि गोविंदाची खरी झलक पाहायला मिळाली ती म्हणजे १९६३ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘ब्लफ मास्टर’ या चित्रपटामध्ये. मनमोहन देसाई दिग्दर्शित या चित्रपटामध्ये बॉलिवूडचा डान्सिंग सुपरस्टार म्हणजेच अभिनेता शम्मी कपूरचं वेगळं रुप पाहायला मिळालं होतं.

वाचा : ‘चक दे! इंडिया’विषयी या गोष्टी तुम्हाला माहितीयेत का?

लांब बाह्यांचा शर्ट दुमडत मोठ्या उत्साहात निघालेल्या गोविंदांच्या टोळीत शम्मीजींनी घेतलेली ती उडी आजही सर्वांच्या लक्षात आहे. मुख्य म्हणजे गोविंदाच्या गाण्यांचा विषय येताच सर्वप्रथम ‘गोविंदा आला रे आला…’ हेच गाणं सर्वांसमोर येतं. काही वेबसाइट आणि सोशल मीडियावरील उपलब्ध माहितीनुसार शम्मी कपूर यांना बॉलिवूडचा पहिलावहिला गोविंदा म्हणण्यास हरकत नाही. मोहम्मद रफी यांनी गायलेल्या आणि कल्याणजी- आनंदजी यांनी संगीतबद्ध केलेल्या ‘गोविंदा आला रे आला…..’ या गाण्यावर शम्मी कपूर यांनी धरलेला ठेका अनेक तरुणींना आजही भावतो. त्यामुळे यंदाही गोविंदाच्या उत्साहपूर्ण वातावरणात शम्मीजींच्या या गाण्याचे सूर ऐकण्यास मिळणार यात शंकाच नाही.