News Flash

लक्ष्मीकांत बेर्डे यांना गिरगावात राहण्याचा असाही झाला होता फायदा

....अगदी तसच झालं होतं.

लक्ष्मीकांत बेर्डे

मराठी चित्रपटसृष्टीमध्ये बऱ्याच कलाकारांनी अत्यंत महत्त्वाचं योगदान दिलं आहे. या कलाकारांच्या यादीतील सर्वांच्या आवडीचं नाव म्हणजे दिवंगत अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे. ‘अशी ही बनवा बनवी’पासून ते अगदी ‘एक होता विदुषक’ या चित्रपटापर्यंत आपल्याला लक्ष्मीकांत बेर्डे यांची वेगळी रुपं पाहण्याची संधी मिळाली. मुख्य म्हणजे आपल्या अनोख्या शैलीने प्रेक्षकांची मनं जिंकणारा हा अभिनेता कधी सर्वांचा आवडता ‘लक्ष्या’ झाला हे लक्षातही आलं नाही. अशा या अभिनेत्याच्या गाजलेल्या चित्रपटांच्या गर्दीतील एक नाव म्हणजे ‘हमाल दे धमाल’.

हा चित्रपट बऱ्याच कारणांनी चर्चेत आला होता. बॉलिवूड अभिनेता अनिल कपूर यांची पाहुण्या कलाकाराची भूमिका असणाऱ्या या चित्रपटात वर्षा उसगावकर आणि लक्ष्याच्या केमिस्ट्रीने तर अनेकांचं लक्ष वेधलं होतंच. पण, हमाल म्हणून सर्वांसमोर आलेला हा अभिनेता अनेकांनाच आपलासा वाटला. पुरुषोत्तम बेर्डे दिग्दर्शित या चित्रपटाचा उल्लेख अनेकदा होतोच. पण, त्यातही गोकुळाष्टमीच्या दिवसांमध्ये मात्र बेर्डेंची आठवण आल्यावाचून राहात नाही हेच खरं. ‘खिडकीतल्या ताई आक्का वाकू नका…पुढं वाकू नका…दोन पैसे देतो मला भिजवून टाका…’ असं म्हणत येणारे लक्ष्मीकांत बेर्डे आणि या गाण्यातून झळकणारा उत्साह आजही अनेकांना त्यावर ताल धरायला भाग पाडतो. ‘ढाक्कुमाकूम ढाक्कुमाकूम’ असं म्हणत ‘बोल बजरंग बली की जय’ची आरोळी फोडत ठेका धरणारे लक्ष्मीकांत बेर्डे म्हणजे क्या बात.

अशा या गाण्याविषयीच्या काही अठवणी शेअर करताना चित्रपट समीक्षक दिलीप ठाकूर म्हणाले, ‘फिल्मीस्तान स्टुडिओमध्ये या गाण्याचं चित्रीकरण करण्यात आलं होतं. त्या स्टुडिओमध्येच शेजारी एक कायमस्वरुपी वस्ती आहे. तिथेच या गाण्याच्या चित्रीकरणादरम्यान कल्ला करण्यात आला होता. हे गाणं त्यावेळी फार गाजलं होतं आणि आजही गाजत आहे. त्यामागचं कारण म्हणजे लक्ष्याचा धमाल अंदाज.’

वाचा : … म्हणून स्मिता पाटील अन्नू कपूर यांना सोडायला थेट विमानतळापर्यंत गेल्या होत्या

१९८९ मध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटातील गोपाळकाल्याचं गाणं खऱ्या अर्थाने गाजलं ते म्हणजे त्याच्या अनोख्या अंजादामुळे. या गाण्यात लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या नाचण्याची अनोखी शैली म्हणजे गिरगावच्या मध्यमवर्गीय राहणीमानाकडून त्यांना मिळालेली भेट होती. गणेशोत्सव, गोकुळाष्टमी या सणांचं आणि गिरगावच्या वस्तीचं वेगळं नातं सांगण्याची काहीच गरज नाही. मुख्य म्हणजे या उत्सवांमध्ये सहभागी होणारा, विविध गाण्यांवर ठेका धरणाऱ्या लक्ष्याला याच राहणीमानाचा फार फायदा झाला असं म्हणायला हरकत नाही. गोविंदाचा उत्साह पाहता या प्रकारच्या गाण्यांमध्ये सहसा कोरिओग्राफीपेक्षा कलाकारांचा उत्साह आणि त्यातून उस्फूर्तपणे सर्वांसमोर येणारी अनोखी नृत्यशैलीच लक्षवेधी ठरते. इथेही अगदी तसच झालं होतं. सुर्यकांत लवंदे यांनी चित्रीत केलेल्या आणि अनिल मोहिले यांनी संगीतबद्ध केलेल्या या गाण्यामध्ये ड्रीम सिक्वेन्सही असल्यामुळे हेसुद्धा या गाण्याचं वेगळेपण आहे. तर मग वाट कसली पाहताय, होऊन जाऊदे गोविंदाचा कल्ला…

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 14, 2017 2:41 pm

Web Title: dahihandi 2017 marathi actor laxmikant berde hamaal de dhamaal famous song govinda re gopala
Next Stories
1 ‘या’ तरुणीने चक्क जस्टीन बिबरला नाकारलं
2 फाळणीमुळे दुरावलं होतं हुमाचं कुटुंब
3 Esha Gupta on her nude pictures: पुरुष सभ्य झालेत; त्यांनी ‘तो’ फोटो सेव्ह करायला हवा
Just Now!
X