भारत सरकारने राष्ट्रीय सुरक्षेच्या मुद्द्यावरुन ५९ चिनी अ‍ॅप्लिकेशन्सवर बंदी घालण्याची घोषणा केली आहे. या यादीमध्ये टिक-टॉक या लोकप्रिय अ‍ॅपचा देखील सामावेश आहे. सरकारच्या या निर्णयावर अभिनेत्री डेझी शाह हिने काहिशी नाराजी व्यक्त केली आहे. टिक-टॉक बॅनमुळे बेरोजगार झालेल्या लोकांसाठी तिने दु:ख व्यक्त केलं आहे.

इ टाईम्सला दिलेल्या मुलाखतीत डेझीने सरकारच्या निर्णयाची स्तुती केली. परंतु त्याचबरोबर पैशांसाठी टिक-टॉकवर अवलंबुन असलेल्या लोकांसाठी तिने दु:ख व्यक्त केलं. ती म्हणाली, “टिक-टॉक हे भारतातील सर्वाधिक वापरल्या जाणाऱ्या अॅप्लिकेशन्स पैकी एक होतं. देशातील अनेक लोक टिक-टॉकवर व्हिडीओ टाकून पैसे मिळवत होते. अनेकांसाठी टिक-टॉक हे रोजगाराचं माध्यम होतं. शिवाय अनेक कलाकार आपली कला जगात पोहोचवण्यासाठी टिक-टॉकचा वापर करत होते. सरकारने चीनला धडा शिकवण्यासाठी घेतलेल्या निर्णयाचा आनंद आहे पण त्याचबरोबर बेरोजगार झालेल्या त्या कलाकारांसाठी दु:ख देखील होत आहे.”

लडाख सीमेवरील धुमश्चक्रीनंतर भारत-चीन यांच्यात निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने सोमवारी टिकटॉक, शेअरइट, ब्युटी प्लस या लोकप्रिय चिनी अ‍ॅपसह एकूण ५९ अ‍ॅपवर बंदी घातली. वापरकर्त्यांची माहितीचोरी, तिचा गैरवापर, राष्ट्रीय सुरक्षेला धोका आणि नागरिकांची मागणी यांच्या आधारे बंदी घालण्यात आल्याचे माहिती तंत्रज्ञान खात्याने निवेदनाद्वारे स्पष्ट केले. देशाच्या राष्ट्रीय सुरक्षेला धोकादायक असलेले घटक या माहितीचा गैरवापर करीत असून त्याद्वारे देशाची एकात्मता आणि सार्वभौमत्वाला धक्का पोहोचत आहे. ही अतिशय गंभीर आणि चिंताजनक बाब असून त्यावर तातडीने उपाययोजना करणे आवश्यक आहे, असे केंद्रीय प्रसारण मंत्रालयाने बंदीचे आदेश जारी करताना म्हटले आहे. हे हानीकारक अ‍ॅप बंद करण्यासंदर्भात केंद्रीय गृहमंत्रालयानेही सूचना केली होती. तसेच नागरिकांतूनही या अ‍ॅपबाबत तक्रारी येत होत्या, असेही मंत्रालयाने या आदेशांत म्हटले आहे.