कॉलेज आठवणींचा कोलाज : शिव ठाकरे, नर्तक

मी पंजाबराव देशमुख पॉलिटेक्निक महाविद्यालयातून डिप्लोमा पूर्ण केला. आणि रायसोनी कॉलेजमधून इंजिनीअरिंगची डिग्री घेतली. माझ्या दोन्ही कॉलेज आठवणींचा कोलाज खूप मोठा आणि कॉमेडी आहे. पंजाबराव देशमुख पॉलिटेक्निक महाविद्यालयातला पहिला दिवस अतिशय बेचैनीचा होता. मुळात मला मुंबईला येऊन अभिनय शाळेत प्रवेश घ्यायचा होता. पण ताई म्हणाली, आधी शिक्षण पूर्ण कर, मग तुला हवं ते कर. तिच्या आज्ञेने डिप्लोमाला प्रवेश घेतला. पहिल्या दिवशी खूप तोंड पाडून मी लेक्चरला बसलो. सेमी इंग्लिशमधून दहावी उत्तीर्ण झालो होतो. आता सगळाच अभ्यास इंग्लिशमध्ये सुरू होणार होता, त्यामुळे थोडी भीतीसुद्धा होती. पहिले काही दिवस असेच गेले. मग चांगले मित्रमैत्रिणी आयुष्यात आले. नंतर मी आवडीने कॉलेजला जाऊ  लागलो.

लहानपणापासूनच नृत्याची आवड होती. कॉलेज सुरू झाल्यावर मी स्वत: कोरिओग्राफी करायला लागलो. माझ्या शाळेत जाऊन स्नेहसंमेलनाला विद्यार्थ्यांचे डान्स बसवू लागलो. वेगवेगळ्या शाळेतून मला कोरिओग्राफीची मागणी येऊ  लागली. मला अजूनही ठळक आठवतोय तो दिवस, जेव्हा मला माझं पहिलं मानधन मिळालं होतं. ७५ रुपये मिळाले होते. मग हळूहळू वाढ होत गेली.

मी मनाविरुद्ध जरी डिप्लोमाला प्रवेश घेतला असला तरीही फर्स्ट क्लासने उत्तीर्ण व्हायचं हे मनाशी पक्कं केलं होतं. कॉलेजला रोज जायचो. कोरिओग्राफीचं जास्त प्रेशर नसेल तर लेक्चरलासुद्धा अधूनमधून बसायचो. माझ्या व्यक्तिमत्त्वाकडे आणि भाषाशैलीकडे बघून आजही बऱ्याच जणांना वाटतं की मी शाळा-कॉलेजमध्ये ‘ढ’ असेन. पण मी तसा नव्हतो. एकदा लेक्चरला बसून एक धडा समजला की तो माझ्या डोक्यात आयुष्यभरासाठी सेव्ह व्हायचा. माझा स्वभाव प्रेमळ असल्याने हुशार विद्यार्थीही माझे मित्र होते. वेळोवेळी मला ते मदत करायचे. एकदा असंच झालं. डिप्लोमा करत असताना १३ प्रोजेक्टचं सबमिशन होतं. जे सबमिशनच्या दिवशी मला मैत्रिणीकडून कळालं की, ते प्रोजेक्ट तयार करायचे आहेत आणि ते आजच सबमिट करायचे आहेत. उद्या सबमिट केले तर ‘सी’ ग्रेड दिली जाणार आहे. ज्या ग्रेडचा मला शाळेत असल्यापासून तिटकारा होता. अशा कठीण प्रसंगी माझे मित्रमैत्रिणी माझ्यासाठी धावून आले. एका टॉपर मित्राने त्याचे प्रोजेक्ट्स मला दिले. १३ मैत्रिणी एक एक प्रोजेक्ट लिहायला बसल्या. १० मिनिटात सहज एक प्रोजेक्ट लिहून होत होता. त्यात १३ जणी १३ प्रोजेक्ट लिहीत होत्या, त्यामुळे १० मिनिटांत सगळे १३ प्रोजेक्ट तयार झाले. प्रोजेक्ट घेऊन सरांजवळ सबमिशनला गेलो. प्रत्येक प्रोजेक्टवर वेगवेगळी हस्ताक्षरं होती. सरांच्या लक्षात आलं त्यांनी विचारलं की, ‘‘शिव, प्रत्येक प्रोजेक्टवर वेगवेगळी हस्ताक्षरं कशी रे?’’ त्यावर मी त्यांना म्हणालो, ‘‘अहो सर! त्याचं काय झालं, सगळे प्रोजेक्ट रात्री जागून पूर्ण केले आहेत. त्यामुळे जेव्हा झोप येत नव्हती तेव्हा अशा सुंदर हस्ताक्षरात प्रोजेक्ट लिहिला. जसजशी झोप येऊ लागली तसतसं हस्ताक्षर खराब येऊ  लागलं. सरांना खरंच वाटलं. आणि ‘ए’ ग्रेड देऊन त्यांनी मला पाससुद्धा केलं.

याच कॉलेजमध्ये शिकत असताना एक मोठी घटना घडली, ती अशी. मला कॉलेजमध्ये अनेक मुली भाऊ  मानायच्या. अशाच एका माझ्या मानलेल्या बहिणीला कॉलेजमध्ये एका सरांनी खूप विचित्र पद्धतीने फ्लर्ट केलं. तिने रडत रडत मला ही गोष्ट सांगितली. वास्तविक ती एका वेगळ्या गावात राहणारी मुलगी होती. ती शिक्षणासाठी अमरावतीला आली होती. तेव्हा आमच्या इथे एक नामांकित क्लास होता. जिथे वेगवेगळ्या कॉलेजमध्ये शिकणारे विद्यार्थी त्याच क्लासला शिकवणीला यायचे. त्या क्लासमध्ये मीसुद्धा जायचो. त्या सगळ्या मुलांना एकत्र करून आम्ही या घटनेचा निषेध केला. त्यासाठी कॉलेज एक दिवस बंद ठेवण्यात आलं. मला इतर शिक्षकांनी समजावण्याचा प्रयत्न केला की तुझ्या निकालावर याचा परिणाम होईल. नको यात पडू. पण मला या डिग्रीचा पुढे काय उपयोगच होणार नव्हता हे मला माहीत होतं, म्हणून मी बिनधास्त होतो. या घटनेचे पडसाद पुढे असे उमटले की, कित्येक मुलींनी त्या सरांच्या विरोधात तक्रार केली. त्या मुली घाबरून शांत बसल्या होत्या. पण या निषेध मोर्चाने त्यांना धीर आला. नंतर त्या सरांना कामावरून काढून टाकण्यात आलं. खरं तर माझा यात काहीच स्वार्थ नव्हता; परंतु माझ्या या कामगिरीमुळे मी पंचक्रोशीतल्या कॉलेजमध्ये ओळखला जाऊ  लागलो.रायसोनी कॉलेजमध्ये माझ्या कलेला अधिक वाव मिळाला. या कॉलेजचा कॅम्पस भव्य होता. युथ फेस्टिव्हलमध्ये सहभागी होऊ  लागलो. दोन्ही कॉलेजमध्ये असताना कोणतेही कल्चरल प्रोग्रॅम असले की तिकडे माझा वावर हा असायचाच. डिप्लोमा आणि डिग्री अशा दोन्ही कॉलेजची स्नेहसंमेलने मी गाजवली आहेत. कॉलेजमध्ये असताना आम्हा मित्रांची खूप खाबुगिरी चालायची. रोज घरून जेवणाचा डबा घेऊन जायचो. तो कॉलेजच्या जवळ असलेल्या रोशनी हॉटेलमध्ये जाऊन एकत्र खायचो. माझ्या आईच्या हातची थालीपीठं सर्वाना आवडायची. त्यामुळे थालीपीठाचे दोन डबे आई द्यायची. डिग्रीच्या शेवटच्या वर्षांला असताना मी रोडीजची ऑडिशन दिली आणि माझी निवड झाली. त्यामुळे मला परीक्षा द्यायला जमली नाही.  तसा मला या डिग्रीचा काही उपयोग नसला तरीही आईची इच्छा पूर्ण केल्याचं समाधान मिळवायचं आहे.

शब्दांकन : मितेश रतिश जोशी