महाराष्ट्रातला वजनदार डान्स रिऍलिटी शो ‘डान्सिंग क्वीन’ नुकताच प्रेक्षकांच्या भेटीस आला. एक अनोखी संकल्पना घेऊन या कार्यक्रमाने सर्व स्टिरिओटाइप तोडून एक दमदार कार्यक्रम सादर केला आहे. या कार्यक्रमात सोनाली कुलकर्णी सोबत पहिल्यांदाच परीक्षकाच्या खुर्चीत मुंबईची मुलगी मलिष्का दिसणार आहे.
अद्वैत दादरकर या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करणार असून यात एकूणसोळा वजनदार स्पर्धक प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी सज्ज झाले आहेत. यातील स्पर्धक जितके वजनदार आहेत त्याहून जास्त त्यांचे परफॉर्मन्सेस दमदार आहेत. त्यामुळे प्रेक्षकांच्या मनोरंजनाची हमी देणाऱ्या या कार्यक्रमातील स्पर्धक आणि परीक्षक यांच्यासोबत अधिक जाणून घ्यायची उत्सुकता प्रेक्षकांना लागली आहे. या सर्व वजनदार स्पर्धकांचा डान्सिंग क्वीनच्या मंचापर्यंतचा प्रवास सोपा नव्हता. त्यामुळे त्यांच्या डान्सची सुरुवात कशी झाली आणि त्यांचा आतापर्यंतचा प्रवास प्रेक्षकांसमोर सादर करण्यासाठी झी युवा वाहिनी ‘डान्सिंग क्वीन अनलॉक’ हा खास कार्यक्रम प्रेक्षकांच्या भेटीस घेऊन आली आहे.
स्पर्धकांची रिहर्सलची जय्यत तयारी, कोरिओग्राफरसोबत होणारी जुगलबंदी, परीक्षकांसोबत स्पर्धकांची ऑन सेट चालणारी धमाल मस्ती या आणि अशा असंख्य कॅमेरा मागे घडणाऱ्या इंटरेस्टिंग गोष्टी प्रेक्षकांना खास या कार्यक्रमात पाहायला मिळतील. हा विशेष कार्यक्रम झी युवा वाहिनी प्रेक्षकांसाठी सादर करणार असून डान्सिंग क्वीन अनलॉकच्या पहिल्याच भागात परीक्षक सोनाली कुलकर्णी, मलिष्का आणि शोचा संचालक अद्वैत दादरकर त्यांच्या आवडत्या स्पर्धकांबद्दल बोलताना दिसतायत.
डान्सिंग क्वीन हा शो नुकताच जोरदार प्रतिसादामध्ये सुरु झालाय आणि आता यासोबतच दर आठवड्याला डान्सिंग क्वीन अनलॉकचा भाग प्रेक्षकांच्या भेटीला येणारे ज्यात हा शो बनताना घडणाऱ्या गमती जमती किंवा बिहाईन्ड सीन किस्से दाखवण्यात येतील.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on September 28, 2020 4:51 pm