बॉलीवूडचा मि.परफेक्शनिस्ट आमिर खान याचा ‘दंगल’ हा चित्रपट गेल्या वर्षी २३ डिसेंबरला प्रदर्शित झाला. आता जवळपास हा चित्रपट प्रदर्शित होऊन एक महिना पूर्ण होत आला आहे. मात्र, या दरम्यान प्रदर्शित झालेल्या चित्रपटांमध्ये ‘दंगल’नेच बाजी मारल्याचे चित्र असून प्रेक्षक अजूनही याच चित्रपटाकडे खेचले जात आहेत. या चित्रपटाने जगभरात बॉक्स ऑफिसवर ७२१.१४ कोटींची कमाई केली आहे.

कोइमोइ डॉट कॉम या संकेतस्थळाने दिलेल्या माहितीनुसार, नितेश तिवारी दिग्दर्शित ‘दंगल’ने भारतामध्ये बॉक्स ऑफिसवर २३.४७ कोटी डॉलर कमविले आहेत. आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये चित्रपटाने १९७.६७ कोटी कमविले आहेत. त्यामुळे, आमिरचा हा चित्रपट जगभरात सर्वाधिक कमाई करणारा दुसरा चित्रपट ठरला असून, ‘पीके’ नंतर ‘दंगल’ने ७२१.१४ कोटींची बक्कळ कमाई केली आहे. यापूर्वी, आमिरच्याच ‘पीके’ चित्रपटाने जगभरात ७९२ कोटी इतकी कमाई केली होती. पीकेचा रेकॉर्ड अद्याप कोणत्याही चित्रपटाला मोडता आलेला नाही.

दुसरीकडे, इतर दिग्दर्शक चलनकल्लोळाला लढा देत आहेत. खासकरून, निश्चनीकरणचा फटका हा बॉक्स ऑफिसवरच झालेला दिसत आहे. या परिस्थितीतही आमिरच्या चित्रपटाने भारतात ३७३.९१ कोटींची कमाई केली असून अजूनही हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर आपली कमाल दाखवत आहे. या चित्रपटाने देशभरात विक्रमी कमाई तर केलीच आहे. पण केवळ एकट्या मुंबई शहरामध्ये तब्बल १०० कोटींच्यावर कमाई करुन एक नवा विक्रमही चित्रपटाने रचला असल्याची माहिती ‘पिंकविला’ या संकेतस्थळाने काही दिवसांपूर्वीच दिली होती.

कुस्तीपटू महावीर सिंग फोगट आणि त्यांच्या मुलींच्या जीवनावर, कारकीर्दीवर बेतलेले कथानक या चित्रपटाद्वारे साकारण्यात आले आहे. अभिनेता आमिर खान, फतिमा सना शेख, सान्या मल्होत्रा या कलाकारांनी रुपेरी पडद्यावर साकारलेल्या व्यक्तीरेखांनाही प्रेक्षकांनी चांगलीच पसंती दिली आहे.