बॉलीवूडमध्ये ‘दंगल’ या चित्रपटाने पदार्पण करणारी बालकलाकार झायरा वसिम हिने आपल्या अभिनयाने सर्वांची मने जिंकली आहेत. अभिनयाची आपली चुणूक दाखविल्यानंतर आपण अभ्यासातही कुठेही कमी नसल्याचे झायरा वसिमने सिद्ध केले आहे. झायराचा १० वी बोर्डाचा निकाल लागला असून तिला ९२ टक्के मिळाले आहेत.

एकीकडे आता ‘दंगल’ चित्रपटाने बॉक्स ऑफिसवरील जवळपास सगळेच रेकॉर्ड मोडले आहेत. तर दुसरीकडे झायरा ९२ टक्क्यांनी बोर्डात पास झाल्याने ती आखाड्यासोबतच अभ्यासातही चॅम्पियन असल्याचे तिने दाखवून दिलेय. झायराने नोव्हेंबर महिन्यात जम्मू कश्मीर बोर्डातून परिक्षा दिली होती. गुरुवारी या परिक्षेचा निकाल लागला. झायरा ही पॉल्स इंटरनॅशनल अकॅडमीची विद्यार्थिनी आहे.

भारतात २३ डिसेंबरला प्रदर्शित झालेल्या ‘दंगल’ या चित्रपटाला प्रेक्षकांनी भरभरुन प्रतिसाद दिला आहे. प्रदर्शित झालेल्या दिवसापासूनच आमिरच्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवरील एक एक विक्रम मोडित काढायला सुरुवात केली होती. सलमान खानच्या ‘बरजरंगी भाईजान’ या चित्रपटाचा विक्रम मोडित काढत आमिरच्या ‘दंगल’ने ‘पीके’ या चित्रपटालाही कमाईच्या बाबतीत मागे टाकले आहे. सध्याच्या घडीला ‘दंगल’ हा चित्रपट आतापर्यंतच्या हिंदी चित्रपटांमधील सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला आहे. महावीर सिंग फोगट आणि त्यांच्या मुलींच्या कुस्तीपटू होण्याच्या प्रवासावर बेतलेल्या या चित्रपटाने ३५० कोटी रुपयांच्या कमाईचा आकडाही पार केला आहे. चित्रपट समीक्षक तरण आदर्श यांच्या ट्विटर अकाऊंटवरुनही त्यांनी या चित्रपटाच्या कमाईचा आकडा जाहिर केला आहे. ‘दंगल’ने सलमान खानच्या ‘सुलतान’ या चित्रपटाचा देशांतर्गत बॉक्स ऑफिस कमाईचा म्हणजेच ३०१ कोटींचा विक्रम पार केला असून, जवळपास इतर सर्वच चित्रपटांवर मात करत बाजी मारली आहे. दरम्यान, आता दंगलने आंतरराष्ट्रीय बाजारात २०० कोटींच्यावर कमाई केली आहे. चित्रपटाला मिळालेल्या या घवघवीत यशामुळे आता मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान आणि संपूर्ण ‘दंगल’ची टीमच उत्साहात असणार यात शंकाच नाही. काही दिवसांपूर्वीच आमिरने हे स्पष्ट केले होते की, त्याला बॉक्स ऑफिस कमाईचे आकडे जास्त महत्त्वाचे नाहित. ‘मी कमाईच्या आकड्यापेक्षा प्रेक्षकांच्या प्रतिक्रियांना जास्त महत्त्व देतो. मला त्या आकड्यांमध्ये काहीही रस नाही. प्रेक्षकांची मनं जिकणं हाच माझ्या चित्रपटांचा मुख्य हेतू असतो’, असे आमिर ‘आएएनएस’ला दिलेल्या मुलाखतीत म्हणाला होता.