पाच दशकापेक्षा जास्त काळ चाहत्यांच्या मनावर राज्य करणारा जेम्स बॉण्ड ही इतिहासातील सर्वात लोकप्रिय व्यक्तिरेखांपैकी एक आहे. बॉण्ड चित्रपट मालिकेतील २५ वा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकतीच या चित्रपटाची घोषणा करण्यात आली आहे. चित्रपट व्यापार विश्लेषक तरण आदर्श यांनी ट्विटरच्या माध्यमातून ही माहिती दिली.

जमायका येथे २८ एप्रिलपासून या चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात करण्यात येणार आहे. या चित्रपटामध्ये यावेळी देखील डॅनियल क्रेग हा जेम्स बॉण्डची व्यक्तीरेखा साकारणार आहे. विशेष म्हणजे डॅनियल क्रेग तब्बल पाचव्यांदा एजंट 007′ ही भूमिका साकारत आहे. या भूमिकेसाठी त्याने तब्बल ४५० कोटी रुपयांचं मानधन स्वीकारल्याचं सांगण्यात येत आहे. डॅनियल २००६ पासून जेम्स बॉण्ड ही भूमिका साकारत आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार, या चित्रपटाचं चित्रीकरण जपान आणि दक्षिण फ्रान्समध्ये होणार आहे. या चित्रपटाची कथा रेमंड बेन्सन यांच्या Never Dream of Dying या कादंबरीवर आधारित आहे. आतापर्यंत प्रदर्शित झालेल्या जेम्स बॉण्डच्या चित्रपटांमध्ये क्रेग व्यतिरिक्त रोजर मूर, शॉन कॉनरी, प्रियस ब्रॉसनन, टिमोथी डॉल्टन आणि जॉर्ड लेजेनबे यांनी एजंट 007 ही भूमिका वठविली आहे.

दरम्यान, या चित्रपटाचं डॅनी बोएल हे दिग्दर्शन करणार होते. मात्र काही कारणास्तव त्यांना हा चित्रपट सोडावा लागला. आता या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा कॅरी जोजी फुफुनागा सांभाळणार आहेत.