News Flash

विदेशी वारे : क्रेगचा अखेरचा ‘बॉण्ड’पट

‘नो टाइम टू डाय’ हा त्याचा नवा बॉण्डपट एप्रिलमध्ये प्रदर्शित होतो आहे. बॉण्डपटांच्या मालिकेतील हा आपला अखेरचा चित्रपट असेल

(संग्रहित छायाचित्र)

रेश्मा राईकवार

ब्रिटिश अभिनेता डॅनियल क्रेग आता ‘बॉण्ड’पटांना निरोप देणार आहे. ‘नो टाइम टू डाय’ हा त्याचा नवा बॉण्डपट एप्रिलमध्ये प्रदर्शित होतो आहे. बॉण्डपटांच्या मालिकेतील हा आपला अखेरचा चित्रपट असेल, असे डॅनियल क्रेगने जाहीर केले आहे. एका मुलाखतीच्या कार्यक्रमात त्याला बॉण्डपटांबद्दल प्रश्न विचारण्यात आला होता, त्याला उत्तर देताना आता जेम्स बॉण्ड आपला अवतार संपवणार असल्याचे त्याने सांगितले. डॅनियल क्रेग २००६ मध्ये पहिल्यांदा जेम्स बॉण्ड म्हणून प्रेक्षकांसमोर आला होता. ‘कसिनो रॉयल’ हा त्याचा पहिला बॉण्डपट. त्यानंतर डॅनियलने ‘क्वॉन्टम ऑफ सोलॅस’(२००८), ‘स्कायफॉल’(२०१२) आणि ‘स्पेक्टर’ (२०१५) असे तीन ओळीने बॉण्डपट केले. आता पाच वर्षांनी त्याने साकारलेला डिटेक्टिव्ह जेम्स बॉण्ड ‘नो टाइम टू डाय’ या चित्रपटातून लोकांना दिसणार आहे. ही एकाच वेळी आनंदाची गोष्ट असली तरी हा त्याचा शेवटचा बॉण्डपट असल्याने यापुढे तो बॉण्ड नसणार यामुळे त्याचे चाहते नाराज आहेत. मात्र आपला अखेरचा बॉण्डपट उत्तम व्हावा, यासाठी डॅनियलची धडपड सुरू होती. त्याने या चित्रपटाच्या पटकथेवर काम करण्यासाठी अ‍ॅमेझॉन प्राइमची वेबसीरिज ‘फ्लीबॅग’ची कर्तीधर्ती फीबे वॉलर ब्रिज हिची नियुक्ती केली होती. ‘फ्लीबॅग’मध्ये तिने जोरदार काम केले होते हे मला माहिती होतंच, पण मी ‘किलिंग इव्ह’ पाहिला होता. तो ज्या पद्धतीने तिने लिहिला होता ते सगळं भव्यदिव्य होतं. त्यामुळे तिने या चित्रपटावर काम करावं अशी इच्छा होती, असे डॅनियलने सांगितले. ‘नो टाइूम टू डाय’नंतर बॉण्डपटांच्या सिक्वलमध्ये काम करण्याची या ५१ वर्षीय अभिनेत्याची इच्छा नाही, मात्र त्याच्या आवडीच्या एका सिक्वलपटात काम करायला मिळावं यासाठी त्याची धडपड सुरू आहे. ‘नाइव्ह्ज आउट’ हा त्याचा चित्रपट गेल्या वर्षी प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात डॅनियलने डिटेक्टिव्ह बेनॉइट ब्लान्कची भूमिका केली होती. या चित्रपटाचा सिक्वल करणार असल्याचे चित्रपटाचा दिग्दर्शक रायन जॉन्सन याने जाहीर केले आहे. हा चित्रपट एक उत्तम अनुभव होता, त्यामुळे या चित्रपटाच्या सिक्वलमध्ये काम करायची खूप इच्छा असल्याचे डॅनियलने म्हटले आहे. केवळ हा चित्रपटच नाही तर रायनने कुठलाही चित्रपट लिहिला तर त्यात काम करायची इच्छा असल्याचे त्याने म्हटले आहे. एकूणच बॉण्डपटातून डॅनियलचे कौतुक झाले असले तरी त्याला त्याच्याबाहेरच्या भूमिका करायच्या आहेत, हेच लक्षात येते आहे.

काहीसे असेच..

‘जोकर’ चित्रपटाला ऑस्करसाठी सर्वाधिक नामांकने मिळाली असल्याने चित्रपटाच्या निर्मात्यांपैकी एक म्हणून अभिनेता ब्रॅडली कूपरचे सगळीकडे कौतुक होते आहे, त्यामुळेच असेल त्याची पत्नी मॉडेल इरिना शेकला त्याच्याबद्दल विचारणा होते आहे. हॉलीवूडमध्ये अनेक नामांकित अभिनेता-अभिनेत्री प्रेमात पडून पती-पत्नी म्हणून एकत्र आले. मात्र एकत्र नांदू शकले नाहीत, अशा अनेक शोकांतिका हॉलीवूडने अनुभवल्या आहेत. ब्रॅडली आणि इरिना यांचाही गेल्या वर्षीच्या जूनमध्ये घटस्फोट झाला आहे. त्यामुळे सध्या वेगवेगळे राहात असलेल्या या दोघांबद्दलही त्यांच्या चाहत्यांच्या मनात अजूनही उत्सुकता आहे. ब्रॅडलीपासून विभक्त झाल्यानंतर इरिनाने मुलीसह नव्या आयुष्याची सुरुवात केली आहे. त्याच्याशिवायचे आयुष्य पूर्णपणे नवीन आहे. आम्ही दोघही नशीबवान आहोत की एकत्रित आमच्या वाटय़ाला आलेले सुखाचे क्षण आम्ही उपभोगू शकलो. पण दोन चांगल्या व्यक्ती एकत्रितपणे जोडपं म्हणून वावरताना तितक्याच चांगल्या असतील असं होत नाही, असे म्हणत इरिनाने आपल्या भावनांना मोकळी वाट करून दिली आहे. नामांकित मॉडेल असलेली इरिना आणि हॉलीवूड अभिनेता ब्रॅडली कूपर गेली चार वर्ष एकत्र होते. या दोघांना एक मुलगीही आहे. सध्या इरिना आपल्या मुलीचा सांभाळ करते आहे. एकाच वेळी आई म्हणून मुलीचं संगोपन करणं आणि मॉडेल म्हणून आपली कारकीर्द सांभाळणं ही तारेवरची कसरत अवघड असल्याचं तिने म्हटलं आहे. अनेकदा आपल्या आजूबाजूचं सगळंच जग कोसळून पडतं आहे, असं वाटतं. आपण हे सगळं पुढे नेऊ शकणार नाही, अशी निराशेची भावना मनात घर करून राहते, असे स्पष्ट करत ब्रॅडलीपासून विभक्त होणं तिच्यासाठी फार जड जात आहे, हेही तिने मनमोकळेपणाने एका मुलाखतीत कबूल केलं आहे. मात्र पती-पत्नी म्हणून आपण एकत्र नांदू शकत नाही, याची स्पष्ट जाणीव असलेल्या इरिनाने याच पद्धतीने पुढे जाण्याचा निर्धारही व्यक्त केला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 2, 2020 4:32 am

Web Title: daniel craigs last bond film abn 97
Next Stories
1 ‘‘आविष्कार’च्या प्रायोगिक नाटय़गृहाची स्वप्नपूर्ती होणार!’
2 चौथ्या आठवड्यातही ‘तान्हाजी’ हाऊसफुल; इतर चित्रपटांची दांडी गुल
3 Video: “ते तिचं शरीर आहे ती…”; डीपनेक गाऊनसंदर्भात प्रियांकाच्या आईची पहिली प्रतिक्रिया
Just Now!
X