अभिनय क्षेत्रात हौशी ते व्यवसायिक अशा अनेक प्रकारचे कलाकार दिसून येतात. काही आपली कला प्रेक्षकांपर्यंत पोहोचवता यावी यासाठी तर काही केवळ प्रसिद्धी आणि पैशासाठी या क्षेत्रात येतात. मात्र ज्यांना अभिनयच येत नाही त्या मंडळींना समाजमाध्यमांवरून अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली उगाचच कोणावरही टीका करणे, इंटरनेटवर वेडेवाकडे फोटो अपलोड करणे या माध्यमातून चर्चेत राहावे लागते. या तथाकथित अभिनेत्यांमध्ये सध्या डॅनिअल एड हे नाव झळकते आहे.
ट्रम्पवरील टीका, मला माझी पत्नी व झोप या दोघांमधील एकाची निवड करायची असेल तर मी झोप निवडेन यांसारखी विचित्र विधाने, लेट नाइट पार्टीमधून केले जाणारे प्रकार यामुळे सतत चर्चेत राहणारा डॅनिअल हा सध्या आपल्या सोनेरी केसांमुळे चर्चेत आहे. त्याने नुकताच ७५ हजार अमेरिकी डॉलर्स ( ५३ कोटी ३९ लाख रुपये ) खर्च करून आपल्या केसांचा विमा उतरवला आहे. त्याच्या मते जगातील सर्वात सुंदर केस असलेला तो एकमेव आहे. त्याने आपल्या अभिनय कारकीर्दीत जे काही थोडेबहुत यश मिळवले आहे. त्यामागे त्याच्या केसांचा सिंहाचा वाटा आहे, असे तो म्हणतो. त्यामुळे गायक आपल्या कंठाचा, वादक आपल्या हातांचा विमा उतरवतो कारण ते आपला कंठ आणि हातांच्या माध्यमातून आपली कला चाहत्यांपर्यंत पोहोचवतात. त्याच धर्तीवर अन्य कसलाही विचार न करता त्याने त्याच्या केसांना योग्य संरक्षण मिळावे यासाठी त्यांचा विमा उतरवला आहे.
डॅनिअल एडच्या केसांनीसुद्धा असा कोणताच पराक्रम केलेला नाही. इतकेच कशाला एवढे सुंदर केस असल्याचा दावा करणारा हा कलाकार आजपर्यंत कोणत्याही केशवर्धक तेल, गोळ्या, शॅम्पूच्या जाहिरातीत सुद्धा झळकलेला नसताना या केसांचा विमा उतरवून त्याने नेमका कसला प्रकाश पाडलाय?, अशी गमतीची चर्चा सध्या लोकांमध्ये रंगली आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on September 21, 2019 7:13 pm