एकाच क्षेत्रातील दोन भिन्न प्रवृत्तीच्या व्यक्तीमधील मतभेद काही नवीन नाहीत. परंतु या मतभेदांचे रूपांतर वादात होणार नाही यासाठी जागरूक राहणे गरजेचे ठरते. अन्यथा खेळाडू व प्रशिक्षक यांच्यातील अंतर्गत मतभेदांमुळे भारत व पाकिस्तान हे दोन्ही संघ २००७ साली क्रिकेट विश्वचषक स्पर्धेतून पहिल्याच फेरीत बाद झाले होते. अशीच काहीशी वेळ ओढवण्याची शक्यता असते. हॅरी पॉटर या सुपरहिट चित्रपट मालिकेचा प्रीक्वल ‘फॅन्टॅस्टिक बीस्ट २’ मध्ये सुपरस्टार जॉनी डेपबाबत अशीच अंतर्गत धुसफूस सध्या मोठय़ा प्रमाणावर सुरू आहे. खरे तर निर्मात्यांनी लेखिका जे. के . रोलिंगच्या हट्टापायी जेव्हा या चित्रपटात जॉनी डेपचे नाव घोषित केले तेव्हापासूनच दिग्दर्शक डेव्हिड येट्स आणि काही कलाकारांमध्ये नाराजीचा सूर उमटू लागला होता, परंतु आता या मतभेदांनी जाहीर वादाचे स्वरूप घेतले आहे.

हॅरी पॉटर फेम डॅनियल रॅडक्लिफने वृत्तमाध्यमांतून जॉनीवर जाहीर निशाणा साधत आपली नाराजी व्यक्त केली आहे. त्याच्या मते जॉनी हा एक उत्तम कलाकार असून याबाबत कोणाच्याही मनात तीळमात्र शंका नाही, मात्र तो एक बेशिस्त माणूस आहे. दिग्दर्शकाने दिलेल्या वेळा तो कधीच पाळत नाही. मनाला वाटेल त्या वेळी तो सेटवर हजर होतो. तसेच वेळी अवेळी त्याची दारू पिण्याची सवय अनेकांना संकटात टाकते. चित्रपटाचे यश हे त्यातील कलाकारांनी किती उत्तम दर्जाचे काम केले आहे यावर अवलंबून असते. आणि यासाठी प्रत्येक कलाकाराने आपली जबाबदारी लक्षात घेऊन त्या अनुषंगाने काम करणे अपेक्षित आहे. जॉनी डेपसारखे काही कलाकार स्वत:ला व्यवस्थेपेक्षा मोठे समजतात. परिणामी निर्मात्यांचे कोटय़ावधींचे नुकसान होते. आणि त्याचा आर्थिक त्रास इतर सहकलाकारांना सहन करावा लागतो, अशा तिखट शब्दांत डॅनियलने जॉनीवर टीका केली.

जॉनी डेपच्या बेशिस्त प्रवृत्तीवर आजवर मार्टिन स्कोर्सेजी, वूडी अ‍ॅलन, जेम्स कॅमरून यांसारख्या अनेक निर्माता-दिग्दर्शकांनी बोट ठेवले आहे. त्याच्या बेशिस्तपणामुळे ‘पायरेट्स ऑफ द कॅरेबियन: डेड मेन टेल नो टेल्स’ या चित्रपटाला आठ महिने उशीर झाला होता. आणि त्यामुळे निर्मात्यांना तब्बल २५० कोटींचे नुकसान सहन करावे लागले होते. त्याचा हा राजेशाही कारभार पाहून दिग्दर्शक डेव्हिड येट्स यांनी त्याला अनेकदा समज दिली, परंतु कलाकारांच्या नाराजीचा सूर पाहता पालथ्या घडय़ावर पाणी अशीच त्याची अवस्था कायम असल्याचे दिसून येते.