सेन्सॉर बोर्डाने चित्रपटाला हिरवा कंदील देऊनही, राष्ट्रीय पुरस्कार पटकावूनही जर चित्रपटाला विरोध होत असेल, तर हा कलाकाराच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर घाला आहे, अशी प्रतिक्रिया ‘दशक्रिया’ या चित्रपटाचे दिग्दर्शक संदीप पाटील यांनी दिली. या चित्रपटावर बंदी आणण्याची मागणी ब्राह्मण महासंघाने केली. यामध्ये हिंदू परंपरांची बदनामी केल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

एकीकडे संजय लीला भन्साळी यांचा ‘पद्मावती’ या चित्रपटाला राजपूत संघटनांचा होत असलेला विरोध ताजा असतानाच आता ‘दशक्रिया’लाही ब्राह्मण संघटनांकडून विरोध होत आहे. चित्रपटांना अशाप्रकारे होत असलेला विरोध पाहता हा चित्रपट निर्मात्यांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर घाला आहे का, असा प्रश्न आता विचारला जाऊ लागला आहे.

चित्रपटाची संहिता सेन्सॉर बोर्डाने मान्य केली. तरीही याला विरोध होत असेल तर महाराष्ट्रासारख्या पुरोगामी राज्याने याचा विचार केला पाहिजे. चित्रपटात सामाजिक विषमतेवर भाष्य केले आहे. चित्रपट न पाहता त्याला विरोध करणे अयोग्य आहे, असे संदीप पाटील म्हणाले. त्याचप्रमाणे अशाप्रकारचे विरोध हे फक्त प्रसिद्धीसाठी केले जात असल्याचे मत त्यांनी मांडले.

ज्येष्ठ लेखक बाबा भांड यांच्या ‘दशक्रिया’ या कादंबरीवर आधारित हा चित्रपट १७ नोव्हेंबर रोजी प्रदर्शित होत आहे. यामध्ये दिलीप प्रभावळकर, मनोज जोशी यांच्या मुख्य भूमिका आहेत.