||  निलेश अडसूळ

तिसरी घंटा वाजते. नाटकाचा पडदा उघडतो. समोर सुरू असलेले नाटक डोळ्यात साठवून प्रेक्षक घरी परततो. प्रयोगावर प्रयोग रंगतात आणि अमुक एका कलाकाराचे नाटक म्हणून त्या कलाकृतीची ओळख निर्माण होते. आजही आपण जुन्या नाटकांची नावे घेताना, त्या त्या कलाकाराच्या नावानिशी घेतो. पण ते नाटक अजरामर करण्यासाठी हजारो हात पडद्यामागून काम करत असतात. ती कलाकृती पडद्यापुढच्या कलाकारांइतकीच त्यांचीही असते. रंगमंच कामगार अशी त्याची संज्ञा होत असली, तरी ते ‘नाट्यकर्मीच’ अगदी हाडाचे. कारण आयुष्यभर पडद्यामागे काम करून पूर्ण वेळ याच व्यवसायाचे ते पाईक राहिले आहेत. याच रंगभूमीवरच्या योद्ध्यांची अवस्था गेल्या वर्षभरात पार बिकट झाली आहे. करोनामुळे काम थांबल्याने ना उपजीविकेचे दुसरे साधन त्यांना मिळाले, ना सरकारी मदतीचा आधार. मध्यंतरी नाटक सुरू झाल्याने त्यांनी कंबर कसली होती खरी, पण पुन्हा करोना कहर वाढल्याने त्यांच्यापुढे अंधार दाटला आहे. केवळ सरकारी मदतच आम्हाला वाचवू शकते, अशी आर्जवं त्यांच्याकडून होत आहेत…

‘अक्रोड फोडून उपजीविका’

हे संकट सगळ्यांसाठी सारखे आहे, इतकी समज आम्हालाही आहे. अडचणी प्रत्येकालाच आहेत, पण वर्षभरात नाट्य क्षेत्राला सरकारने मदतीचा हातही दिला नाही याचे दु:ख आहे. नाटकाचे गोडवे सगळेच गातात पण मदतीचे काय? प्रत्येकजण एकमेकांकडे नोकरीसाठी विचारणा करत आहेत. बहुतांशी लोकांचे वय चाळीशी पार असल्याने नोकऱ्या मिळण्याचे सर्व मार्ग बंद आहेत. घरात मी एकटाच कमावता असल्याने कुटुंबाची जबाबदारी कशी पेलायची याचा घोर मनात असतो. वडीलही अंथरुणात आहेत. आम्ही अक्रोड फोडायचे काम स्वीकारले आहे. २५ किलोची एक गोण फोडून आम्हाला शंभर रुपये मिळतात. या काळात अक्रोड फोडून का होईना आम्ही जगतोय याचे समाधान खूप आहे.

– प्रशांत मळगावकर, ध्वनी संयोजक 

‘रंगाचा बेरंग…’

वयाच्या १४ व्या वर्षी मी रंग हातात घेऊन रंगभूषेसाठी उभा राहिलो. आजवर नाटकाने बरेच काही दिले. गेल्यावर्षी सहज मनात आले की रंगभूषेला जोडव्यवसाय म्हणून नाटकाची बस घ्यावी. तशी तयारी करून कर्जावर एक बस घेतली आणि काही महिन्यांतच टाळेबंदी जाहीर झाली. आता रंगभूषेचे काम थांबल्याने आर्थिक नुकसान झालेच आहे. पण कर्जावर बस घेतल्याने त्याचे हप्ते, चालकाचा पगार, देखभाल खर्च याचा भुर्दंड डोईजड झाला आहे. घरही गहाण पडले आहे. काही मित्रांनीही मदतीचा हात पुढे केला, पण आता  परिस्थिती गंभीर होऊ लागली आहे. किमान उपजीविकेपुरती तरी मदत आम्हाला मिळायला हवी.

– संदीप नगरकर, रंगभूषाकार

‘कुटुंबीयांनी तारले पण…’

विविध नाटकांचे संगीत संयोजन करून गेली काही वर्षे मी उपजीविका करत आहे. वर्षभरात नाटक थांबल्याने निश्चितच आर्थिक चणचण भासते आहे, पण सुदैवाने कुटुंबीयांचा आधार भक्कम असल्याने हा काळ निभावून नेला आहे. मध्यंतरी मालिकांकडे वळण्याचाही प्रयत्न केला, पण टाळेबंदीने त्याही क्षेत्रावर घाव घातल्याने घरी बसायची वेळ आली. ‘संगीत’ हेच माझ्यासाठी सर्वस्व असल्याने इतर ठिकाणी काम करणे मला योग्य वाटत नाही. पण जे लोक आज केवळ जगण्यासाठी आपली कला बाजूला सारून, मिळेल ती नोकरी करत आहेत त्यांच्याविषयी खंत वाटते. लोकांकडे दैनंदिन खर्च चालवायलाही पैसे उरलेले नाहीत. त्यामुळे सरकारने गरजू रंगकर्मींसाठी तातडीने निधी मंजूर करावा.

– रुपेश दुदम, संगीत संयोजक

‘परिस्थितीने डोळे उघडले’

नाटकात कोणत्याही विभागात काम करणारा माणूस हा कलाकारच असतो. अगदी खिळा ठोकण्यापासून ते पडदा देण्यापर्यंत. प्रत्येकात ती कला असते, वेड असते म्हणून ते स्वत:ला नाटकात वाहून घेतात. पण याच गुणाचा मोठा फटका रंगमंच कामगार सोसतो आहे. नाटकावर मदार असल्याने कधीच बाहेर पडायचा विचार केला नाही किंवा काहीतरी व्यवसाय करावा, शिक्षण घ्यावे असेही कधी मनात आले नाही. त्यामुळे नाटक बंद झाल्यानंतर होणाऱ्या फरपटीमुळे आमचे डोळे उघडले आहेत. जो तो नोकरीसाठी धावाधाव करतो आहे. मिळेल ती नोकरी करायला लोक तयार आहेत, पण आमचे वाढते वय आणि शिक्षणाआभावी कुणीही नोकरीसाठी उभे करत नाही. मी पोटापाण्यासाठी टॅक्सी चालवायचे ठरवले, पण टाळेबंदीमुळे रस्त्यावर प्रवासीच नसल्याने तोही पर्याय वाया गेला. आता भांडी घासायचे काम करायचीही तयारी आम्ही ठेवली आहे.

-विजय गोळे, प्रकाश संयोजक

एक एक दिवस युगासमान…

सध्या माझे वय ६० वर्षे आहे. गेली ४० वर्षे मी नेपथ्य संयोजन करून रंगभूमीची सेवा करतो आहे. याच कामावर इतकी वर्षे आमचे कुटुंब चालले होते. पण आता काम थांबल्याने रोज उद्याची काळजी सतावत असते. घरात दोन तरुण मुले आहेत, पण करोनाने त्यांच्याही नोकऱ्या गिळल्या. कुटुंब चालवण्यासाठी आजही माझी काम करायची तयारी आहे. या वयातही मी उमेद सोडली नाही, पण परिस्थिती इतकी बिकट आहे की कुणी कामही देत नाही. उद्याची चिंता करताना एक एक दिवस युगासमान वाटतो. आम्हाला मदतीची गरज आहे, एवढे मागणे तुमच्या माध्यमातून शासनदरबारी पोहोचवा.   – राजकुमार दरवेशी, नेपथ्य संयोजक

‘भाजी विकली, मसाले विकले… आता?’

मी आणि माझी पत्नी आम्ही दोघेही काम करत होतो. ती कपडे व्यवसायात कामाला होती. करोनाचा फटका इतर व्यवसायालाही बसल्याने तिचीही नोकरी गेली आणि नाटक बंद झाल्याने मीही बेरोजगार झालो. कुटुंब चालवायचे म्हणजे पैसे लागतात. त्यामुळे भाजी विकायला सुरुवात केली, पण नंतर सगळीकडे तेच चित्र असल्याने ग्राहकांआभावी तोही व्यवसाय बंद केला. पुढे कोकणातून रानमेवा आणून तो विकू लागलो. कोकम, कुळीथ पिठी, काजू असे पदार्थ. पण आता खासगी गाड्या कोकणातून मुंबईला येणे बंद झाल्याने गावाहून उत्पादन येणे बंद झाले, आता काय विकून पोट भरायचे याची चिंता आहे. नोकरीसाठीही प्रयत्न सुरू आहेत, पण ४५ वर्षांच्या पुढच्या लोकांना करोनाचा धोका अधिक असल्याचे कारण सांगून अनेकांनी नाकारले.    – बापू सावळ, रंगमंच व्यवस्थापक

‘निर्जंतुकीकरणाचे काम…’

सुरुवातीच्या काळात उसनवार करून दिवस काढले, पण लोकांकडून किती मदत घ्यायची यालाही सीमा आहे. नाटक सुरू होण्याची वाट पाहून अखेर पालिकेत कंत्राटी कामगार म्हणून काम करण्याचे ठरवले. पालिकेच्या सूचनेनुसार लोकांच्या घरोघरी जाऊन मी निर्जंतुकीकरण करतो. एका दिवसाचे २०० रुपये मिळतात. तेही कधी काम मिळते कधी नाही. त्यामुळे उपजीविकेची चिंता कायम आहेच. कपडेपट करून मी इतकी वर्षे कुटुंब चालवले. कधी अशी वेळ येईल याचा विचारही केला नव्हता. सध्या स्थानिक परिसरातून, राजकीय नेत्यांकडून मिळणारी मदतही आम्हाला लाखमोलाची आहे. त्यांनी दिलेल्या डाळ तांदळावर जगणे सुरू आहे.       – कैलास कळंबे, कपडेपट

‘नाना सायास झाले….’

टाळेबंदीनंतर नाटक सुरू झाले तेव्हा आम्हाला प्रचंड आनंद झाला. कारण नाटकाला बुकिंग चांगले झाले तर बुकिंग क्लार्क जगतो.  पण काही काळातच परिस्थिती पालटली. प्रयोगाला येणारी गर्दी कमी झाली आणि कमी कालावधीतच पुन्हा पडदा पडला. आता मदत मागायची कुणाकडे, असा प्रश्न आहे. कारण गेल्या टाळेबंदीत लोकांनी मदतीचा हात दिला. कलाकारांनीही जमेल त्या वस्तू, पदार्थ, जिन्नस विकून व्यवसाय थाटले. काही काळातच तेही बारगळले. कुणी नोकऱ्या केल्या, कुणी मजुरी. आता नाना सायास करून सगळे थांबले आहेत. त्यात तिसऱ्या लाटेची चर्चा असल्याने पुढचे काही महिने नाट्यगृह खुले होईल असे वाटत नाही. आता केवळ मदतीसाठी पाठपुरावा करणे एवढेच आमच्या हातात आहे.   – हरी पाटणकर, बुकिंग क्लार्क

‘कमावणारा एक, खाणारे दहा’

गेल्या वर्षभरात नाटकाचे दौरे होऊ न शकल्याने गाड्या जागेवर उभ्या आहेत. सुरुवातीच्या काळात मदत झाली, पण पुढे ती थांबल्याने घर कसे चालवायचे, हा प्रश्न निर्माण झाला. निर्मातेही अडचणीत असल्याने ते तरी किती काळ पैसे देणार? नाटकाचे दौरे सुट्टीत होत असले तरी आम्ही पूर्णवेळ त्याच बसवर चालक म्हणून काम करतो. आता नोकरी सोडायची की ठेवायची अशी द्विधा मन:स्थिती आहे. वाहतूक व्यवसाय ठप्प झाल्याने दुसरीकडेही चालक म्हणून नोकरी मिळत नाही. माझ्या एकट्याच्या जिवावर कुटुंबातील दहा लोकांचे पोटपाणी चालते. पैसे पाठवू शकत नाही म्हणून मीच गावी आलो. पण इथेही परिस्थिती अत्यंत गंभीर आहे. मुले लहान असल्याने फिरतीची नोकरीही करता येत नाही.     – असीम शेख, नाटक बसचालक 

‘निवृत्तीनंतरच्या अपेष्टा’

एका डोअर कीपरला प्रत्येक प्रयोगामागे ८० रुपये मिळत असतात. त्यामुळे इतक्या तुटपुंज्या मानधनात काम करायला तरुण मुले तयार होत नाहीत. त्यामुळे डोअर कीपर म्हणून काम करणारे बहुतांशी लोक निवृत्त झालेले, वयाची साठी पार केलेले आहेत. विशेष म्हणजे त्यांना उपजीविकेसाठी पैशांची नितांत गरज आहे म्हणून ते या वयातही काम करत आहेत. पण करोनामुळे त्यांच्यावर कठीण परिस्थिती गुदरली आहे. गेल्यावर्षी टाळेबंदी झाल्यापासून त्यांच्या हाताला काम नाही. या वयात कामासाठी बाहेर पडावे तर करोनाचा धोका आहेच. त्यामुळे कुठून काही मदत मिळते आहे का यावर ते अवलंबून आहेत. तशी मदत झाल्यास त्यांना मोठा आधार मिळेल.

– शीतल गावकर, डोअर कीपर व्यवस्थापक