बॉलिवूडमध्ये आता कलाकारमंडळींपेक्षा त्यांच्या मुलांचीच जास्त चर्चा होत असते. अगदी त्यांच्या लाईफस्टाईलपासून ते त्यांच्या करिअरपर्यंत. त्यातच बॉलिवूडमधील अनेक स्टारकिड आपल्या पालकांच्याच पावलावर पाऊल ठेवत कलाविश्वात पदार्पण करत आहेत. आलिया भट्ट,जान्हवी कपूर, सारा अली खान ही त्यातली काही स्टारकिडची उदाहरणं. बॉलिवूडमध्ये पदार्पण करणाऱ्या या नवोदित कलाकारांमध्ये आणखी एका स्टारकिडचं नाव जोडलं गेलं असून ही स्टारकिड अभिनेता सैफ अली खानसोबत स्क्रिन शेअर करणार असल्याचं सांगण्यात येत आहे.
अभिनेत्री पूजा बेदीची मुलगी आलिया फर्निचरवाला लवकरच मोठ्या पडदयावर झळकणार असून ती पहिल्यांदाच सैफसोबत स्क्रिन शेअर करणार आहे. ‘जवानी जानेमन’ असं या चित्रपटाचं नाव असून त्याची निर्मिती सैफ अली खान करणार असल्याचं ‘फर्स्ट पोस्ट’ने म्हटलं आहे.
नितीन कक्कर दिग्दर्शित हा आगामी चित्रपट वडील आणि मुलीच्या नात्यावर भाष्य करणारा असून यात आलिया सैफच्या मुलीची भूमिका साकारणार आहे. कॉमेडी आणि ड्रामा प्रकारात मोडणाऱ्या या चित्रपटाचं पुढील वर्षी लंडनमध्ये चित्रीकरण सुरु करण्यात येणार आहे.
दरम्यान, या चित्रपटामध्ये सैफ आणि त्याची मुलगी सारा अली खान एकत्र झळकणार असल्याचं सांगण्यात येत होतं. मात्र सारा अन्य दुसऱ्या एका प्रोजेक्टमध्ये व्यस्त असल्यामुळे तिने या चित्रपटासाठी नकार दिला. त्यानंतर आता या चित्रपटासाठी आलिया फर्निचरवालाची निवड करण्यात आली आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on November 19, 2018 9:03 am