20 November 2019

News Flash

चित्र रंजन : बदलत्या विचारांचा उंबरठा

लव रंजन लिखित ‘दे दे प्यार दे’ हा या बदलत्या विचारांच्या उंबरठय़ावरचा चित्रपट आहे

(संग्रहित छायाचित्र)

दे दे प्यार दे

रेश्मा राईकवार

काळानुसार गोष्टी बदलल्या आहेत. प्रेमात पडून विवाह केला म्हणून एकमेकांचे पटत नसतानाही आयुष्यभर ते नाते ओढत राहायचे नाही म्हणून घटस्फोटाचा निर्णय घेणे असो किंवा पुन्हा विवाहबंधनात अडकायचा निर्णय असो. इथे त्या दोन व्यक्तींनी प्रामुख्याने विचार करणे, निर्णय घेणे अपेक्षित असते. त्या वेळी आईवडील, मुले, नातेवाईक या सगळ्या घटकांचा विचार नंतर केला जातो. अर्थात, काळानुसार हे स्वातंत्र्य व्यक्तीला मिळालेले असले तरी त्या निर्णयाप्रत येणे आणि घेतलेल्या निर्णयांची जबाबदारी लक्षात घेऊन ती निभावणे या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. लव रंजन लिखित ‘दे दे प्यार दे’ हा या बदलत्या विचारांच्या उंबरठय़ावरचा चित्रपट आहे मात्र, त्यातला विषय हाताळताना पुन्हा एकदा बॉलीवूडी मसाला चौकटीचा आधार घेतला गेला आहे..

पत्नी आणि मुलांपासून वेगळा झालेला पन्नाशीतला एक श्रीमंत न्यूयॉर्कस्थित गृहस्थ आशीष (अजय देवगण) आणि त्याला अचानकपणे एका पार्टीत धडकलेली, आयुष्य उपभोगण्यावर विश्वास असलेली २६ वर्षांची उत्साही आयेशा (रकुल प्रीत सिंग) या दोघांची ही कथा आहे. आपल्यापेक्षा वयाने निम्म्या असलेल्या तरुणीशी लग्न करण्याचा निर्णय घेऊन वैवाहिक आयुष्यात स्थिरावलेली अशी अनेक जोडपी आजूबाजूला आहेत. त्यामुळे त्या अर्थाने ही फार काही नवीन किंवा अवघड गोष्ट राहिलेली नाही. खुद्द चित्रपटाचा नायकही आपल्या मित्राला अगदी सैफ-करीनाचे उदाहरण देत हे पटवून देताना दिसतो. तरीही एकीकडे प्रेम, लग्न सगळे अनुभवलेल्या आशीषला आयेशा आवडते आहे, तो तिच्या प्रेमातही आहे. पण पुन्हा तेच वैवाहिक आयुष्य, त्यानंतर येणाऱ्या जबाबदाऱ्या या वयात पेलण्याची त्याची इच्छा नाही. तर दुसरीकडे तितक्याच स्वतंत्र विचारांची, कुठलेही बंधन न मानणारी बेधडक स्वभावाची असूनही आयेशाला या नात्याला विवाहाच्या बंधनात अडकवणे गरजेचे वाटते. वयाच्या वेगवेगळ्या टप्प्यावर असणारे हे दोघे, दोघांचीही समज वेगळी आणि अशा प्रकारे नात्यात अडकल्यानंतर काय प्रतिक्रिया उमटू शकतात हे लक्षात घेऊन त्यालाही सामोरे जाण्याची त्यांची तयारी आहे. आणि तरीही एका टप्प्यावर ते दोघे वेगळे होण्याचा निर्णय घेतात. चित्रपटाचा पूर्वार्ध बऱ्यापैकी यात खर्ची पडला आहे, मात्र अभी तो पार्टी शुरू हुई है.. म्हणत दिग्दर्शक अकीव अली उत्तरार्धात आपल्याला फार मोठा प्रवास घडवून आणतो. प्रेमाचा स्वीकार केल्यानंतर पुढे जायच्या आधी आशीषला त्याच्या मागे सोडलेल्या कुटुंबाची आठवण होते आणि तो आयेशाला घेऊन पत्नी मंजू (तब्बू)आणि मुलांसमोर उभा ठाकतो. इथे गोष्टी काहीशा त्याच वळणाने पुढे सरकतात, मात्र त्या त्याच साचेबद्धपणाने संपत नाहीत त्यासाठी दिग्दर्शकाचे कौतुक आहे.

दिग्दर्शक म्हणून हा अकीव अलीचा पहिलाच चित्रपट आहे. मात्र या चित्रपटाची कथा ‘प्यार का पंचनामा’, ‘प्यार का पंचनामा २’, ‘सोनू के टिट्टू की स्वीटी’ सारखे चित्रपट देणाऱ्या लव रंजन याची आहे. त्यामुळे ‘दे दे प्यार दे’ या चित्रपटावरही त्याचीच छाप आहे, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. त्यामुळेच एकीकडे या विषयावर अधिक समजूतदार भाष्य अपेक्षित असताना त्याला हसतखेळत उगीचच विनोदाची फोडणी देत त्याचा प्रभाव कमी केला आहे. अजय देवगणने नेहमीच्या सहज पद्धतीने आशीषची भूमिका साकारली आहे. रकुल प्रीत सिंगनेही उत्साहाने खळखळणारी, पण त्याच वेळी आशीषला समजून घेत त्याची वडील म्हणून होणारी घालमेल लक्षात घेत त्याला तितक्याच समजूदारपणाने पुढे जाण्याचा पर्याय देणारी आयेशा उत्तम वठवली आहे.

या चित्रपटात अपेक्षेप्रमाणे तब्बूचे पारडे जड ठरले आहे. तब्बूच्या वाटय़ाला आलेली मंजूची आशीषच्या पत्नीची भूमिका तितकीच कणखर आहे, मात्र एकीकडे या व्यक्तिरेखेला पुढारलेपण देण्याच्या प्रयत्नात दिग्दर्शकाने पुन्हा तिच्याच खांद्यावर समजूतदारपणाची धुरा देत तिला साचेबद्ध केले आहे. नवरा वेगळा झाला, तरी मुले आणि त्याच्या आईवडिलांची जबाबदारी इतकी वर्ष एकटीने सांभाळणारी कणखर स्त्री एका क्षणी कोसळून पडते. नवऱ्याची बाजूही इतरांसमोर उचलून धरणाऱ्या मंजूच्या आयुष्यात असाही एक क्षण येतो जेव्हा तिलाही समजूतदारपणाची ही झूल काढून फेकावीशी वाटते. बेजबाबदारपणे, मन मानेल तसे वागावेसे वाटते. हे कोसळणे आणि पुन्हा त्याच प्रगल्भपणे उभी राहणे हा बदल तब्बूने प्रभावीपणे व्यक्त केला आहे. तब्बूसारख्या अभिनेत्रीकडून तिच्या चाहत्यांना जी अभिनयाची पर्वणी हवी असते ती इथे भरभरून मिळाली आहे. मात्र त्याच वेळी पन्नाशीचा म्हातारा आणि सव्विशीतील तरुणी यासंदर्भात त्याच ठोकळेबाजपणाने येणारे संवाद, के ले जाणारे विनोद याची जोड चित्रपटाला देण्याचा केलेला प्रयत्न या विषयाचे गांभीर्यच घालवून बसतो. तरीही अमिताभ बच्चन यांच्यानंतर अजय देवगणसारख्या बॉलीवूडमधील मोठय़ा कलाकाराला घेऊन केलेला हा प्रयत्न उल्लेखनीय म्हणायला हवा. निदान आजूबाजूला होणारे बदल चित्रपटातून उमटतायेत हेही नसे थोडके. आपल्या मुलांना लग्नाचा निर्णय घेण्याअगोदर एकमेकांबरोबर लिव्ह इनमध्ये राहण्याचा पर्याय अजमावून पाहायचा आहे हे समजून घ्यायला हवे, त्यांच्या त्या स्वातंत्र्याचा आदर करायला हवा, हे सांगणारा वडीलही यात दिसतो. सामाजिक स्तरावर झालेले हे बदल मोठय़ा प्रमाणावर आणि अधिक प्रामाणिक पद्धतीने चित्रपटातून यायला हवेत. ‘दे दे प्यार दे’ मध्ये त्याची काहीएक झलक दिसते हे निश्चित!

दिग्दर्शक – अकीव अली

कलाकार – अजय देवगण, रकुल प्रीत सिंग, तब्बू, जावेद जाफरी, जिम्मी शेरगिल, कुमुद मिश्रा.

First Published on May 18, 2019 12:26 am

Web Title: de de pyaar de movie review
Just Now!
X