अ‍ॅक्शन आणि विनोदी संवादांनी खचाखच भरलेला ‘डेडपूल २’ जगभरात धुमाकूळ घालतो आहे. रायन रेनॉल्ड्सचा उत्तम अभिनय आणि बॉलिवूड स्टार रणवीर सिंगच्या हिंदी डबिंगमुळे भारतातही या चित्रपटाला सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे. परंतु प्रेक्षकांकडून कौतूकाचा वर्षांव होत असतानाही अभिनेता रायन या चित्रपटामुळे अडचणीत आला आहे. शत्रुला आपल्या बोलण्यात गुंतवून अचानक त्याच्यावर हल्ला करणे हे डेडपूलचे खरे वैशिष्टय़ मानले जाते. आणि त्यामुळेच तरुणांमध्ये तो विशेष लोकप्रिय आहे. परंतु याच बोलबच्चनगिरीमुळे तो आता अडचणीत आला आहे.

‘डेडपूल’मध्ये केल्या गेलेल्या संभाषणात त्याने अनेकदा माव्‍‌र्हलचा प्रमुख प्रतिस्पर्धी असलेल्या ‘डीसी’ कंपनीची खिल्ली उडवली आहे. तो एवढय़ावरच थांबला नाही तर त्याने सुपरहिरो ‘ग्रीन लँटन’वर देखील आक्षेपार्ह विधाने केली. त्याने केलेल्या शाब्दिक कोटय़ांना प्रेक्षकांकडून भरभरुन दाद मिळाली. मात्र ‘डीसी’चे सुपरहिरो चाहते डेडपूलच्या या कृत्यावर नाराज झाले आहेत. त्यामुळे त्यांनी डीसीवर केलेले सर्व विनोद इंटरनेटवर ट्रोल करण्यास सुरवात केली.

आजवर माव्‍‌र्हलने आपल्या अनेक चित्रपटांमधून ‘डीसी युनिव्हर्स’ला मिळालेल्या अपयशाची खिल्ली उडवली आहे. परंतु या वेळी त्यांनी थेट सुपरहिरोंचीच नावे घेउन अश्लील विनोद केले आहेत, असा आरोप डीसीच्या चाहत्यांनी केला आहे. दरम्यान ‘डीसी’ प्रशासनाने या कृत्याची गंभीर दखल घेत थेट ट्विटरवरुन रायन रेनॉल्ड्सला यासंदर्भात जाब विचारला, परंतु रायनने डेडपूलच्याच शैलीत उत्तर देत पुन्हा एकदा त्यांच्यावर विनोद केले.

‘डेडपूल’मध्ये सर्वात जास्त ‘ग्रीन लँटन’ या सुपरहिरोची खिल्ली उडवण्यात आली आहे. परंतु गमतीशीर बाब म्हणजे ही सुपरहिरो व्यक्तिरेखा दुसरा तिसरा  कोणी नसून खुद्द रायन रेनॉल्ड्सनेच मोठय़ा पडद्यावर साकारली होती. परंतु तो चित्रपट तिकीटबारीवर आपटल्यामुळे रायनने यापुढे ‘ग्रीन लँटन’ करण्यास साफ नकार दिला. त्यानंतर त्याने ‘डीसी’ कंपनीचाही राजीनामा दिला. व ‘डेडपूल’ म्हणून ‘माव्‍‌र्हल’मध्ये भरती झाला. आणि म्हणूनच ‘जस्टिस लीग’ चित्रपटात ‘ग्रीन लँटन’ला वगळण्यात आले होते. ‘माव्‍‌र्हल’वर सध्या ‘डीसी’ चाहते नाराज आहेत, परंतु ‘माव्‍‌र्हल’ने मात्र या संदर्भात अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही.