आजवर कार्टून, कॉमिक्स आणि व्हिडीओ गेम्सच्या माध्यमातून मनोरंजन करणारा ‘पोकेमॉन’ आता चित्रपटातून चाहत्यांच्या भेटीला येत आहे. या कार्टूनपटाचे नाव ‘द डिटेक्टिव्ह पिकाचू’ ठेवण्यात आले असून त्याच्या दिग्दर्शनाची जबाबदारी रॉब लेटरमॅन यांच्यावर सोपवण्यात आली आहे. ‘पोकेमॉन’ व्हिडिओ गेम्सचे दिग्दर्शक नाओकी मियाशिता यांनी ट्विटरच्या माध्यमातून या चित्रपटाची अधिकृत घोषणा केली.  सातत्यपूर्ण कामगिरीतून कार्टून विश्वात आपली मक्तेदारी निर्माण करणाऱ्या ‘डीसी’, ‘माव्‍‌र्हल’ आणि ‘डिस्ने’ला सर्वात प्रथम १९९६ साली ‘द पोकेमॉन’ या जपानी कार्टूनद्वारे आव्हान दिले गेले होते.

केन सुगिमोरी आणि सातोशी तजेरी यांनी निर्माण केलेले हे कार्टून सुरुवातीला फक्त जपानी व इंग्रजी या दोनच भाषेत उपलब्ध होते, परंतु कालांतराने पोकेमॉनची वाढत जाणारी लोकप्रियता पाहता त्याचे हिंदी, लॅटिन, अरबी, पोर्तुगीज, रशियन यांसारख्या इतर भाषांमध्येही अनुवाद करण्यात आला. आज ‘पोकेमॉन’ हे जगातील सर्वात यशस्वी कार्टूनपैकी एक आहे, परंतु बदलत्या काळानुसार कार्टून स्पर्धकांनी सिनेमा क्षेत्रात गुंतवणूक करण्यास सुरुवात केली. आणि त्यांच्या बरोबरीने बाजारात टिकून राहायचे असेल तर आता मोठय़ा पडद्यावर उतरण्याशिवाय पर्याय नाही हे लक्षात घेऊनच निर्माता निंटेंडो यांनी चित्रपट तयार करण्याचा निर्णय घेतला आहे.

२०१६ साली प्रदर्शित झालेल्या ‘द ग्रेट डिटेक्टिव्ह पिकाचू’ या व्हिडीओ गेम्सच्या आधारावरच ‘द डिटेक्टिव्ह पिकाचू’ या चित्रपटाची निर्मिती केली जाणार असल्याची शक्यता चाहत्यांकडून वर्तवली जात आहे. दिग्दर्शक रॉब लेटरमॅन यांनी मात्र चित्रपटाच्या पटकथेबाबत अद्याप कोणतेही स्पष्टीकरण दिलेले नाही. तसेच यातील मुख्य पात्र ‘पिकाचू’ला ‘डेडपूल’ फेम रायन रेनॉल्ड्स आवाज देणार असल्यामुळे आजवर केवळ ‘पिकाचू’ हा एकच शब्द उच्चारणाऱ्या पिकाचूचा चित्रपटभर वावर कसा असेल याबद्दल चाहत्यांमध्ये प्रचंड कुतूहल निर्माण झाले आहे.