करोना विषाणूमुळे देशात लॉकडाउन घोषित करण्यात आला आहे. सध्या देशातल चौथ्या टप्प्यातील लॉकडाउन सुरु आहे. या काळात सगळ्या क्षेत्रांप्रमाणेच कलाविश्वातील कामकाजही बंद आहे. त्यामुळे अनेक चित्रपटांचं चित्रीकरण आणि प्रदर्शन अर्ध्यावर थांबलं आहे. यात अनेक निर्मात्यांनी चित्रपटगृह बंद असल्यामुळे त्यांचे चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित करण्याचा निर्णय घेतला आहे. यातच ‘कच्चे दिन’ हा चित्रपटदेखील नुकताच प्रदर्शित झाला आहे.

सध्याच्या काळात मजुरांचे प्रश्न आणि त्यांच्या स्थलांतर यावर हा चित्रपट आधारित आहे. एका स्थलांतरित टॅक्सी ड्रायव्हरची ही कथा असून त्यात मुंबईच्या अनेक छटा टिपल्या गेल्या आहेत. काही दिवसापूर्वीच या चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या ट्रेलरने प्रेक्षकांची उत्सुकता कमालीची वाढविली होती. अखेर हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. बॉलिवूड दिग्दर्शक शैलेंद्र सिंग याचा ‘कच्चे दिन’ हा शुक्रवारी (२२ मे) युट्युबवर प्रदर्शित झाला आहे.

या चित्रपटात दिपक दोब्रियाल मुख्य भूमिकेत झळकले असून त्यांनी टॅक्सी ड्रायव्हरची भूमिका साकारली आहे. त्यांच्या व्यतिरिक्त या चित्रपटात यशपाल शर्मा, अश्रूत जैन, टीना सिंग हे महत्त्वपूर्ण भूमिकेत झळकले आहेत.