बॉलिवूडमधली चाहत्यांची सर्वात लाडकी जोडी म्हणजे दीपिका- रणवीर होय. रुपेरी पडद्यावर अनेक चित्रपटांत प्रेमी जोडप्याची भूमिका साकारलेलं हे जोडपं अखेर खऱ्या आयुष्यातही एकत्र येणार आहे. काही महिन्यांपूर्वीच हे दोघंही नोव्हेंबर महिन्यात विवाहबंधनात अडकणार अशा चर्चा होत्या. अखेर दोघांच्या लग्नाची तारीख समोर आली आहे.

‘फिल्म फेअर’नं दिलेल्या वृत्तानुसार हे जोडपं अखेर २० नोव्हेंबरला विवाहबंधनात अडकणार आहे. अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि क्रिकेटर विराट कोहली यांच्याप्रमाणेच दीपिका आणि रणवीरही इटलीतचं डेस्टिनेशन वेडिंग करणार आहे . या विवाहसोहळ्यासाठी दीपिका आणि रणवीरच्या कुटुंबातले मोजकेच ३० लोक उपस्थित राहतील अशी माहिती खात्रिलायक सुत्रानं दिली आहे. इटलीतील लोम्बा येथे असणाऱ्या लेक कोमो, या नयनरम्य ठिकाणी हा विवाहसोहळा पार पडणार आहे.

या लेकच्या किनाऱ्यालगत असणाऱ्या सुंदर व्हिलामध्ये हा विवाहसोहळा संपन्न होणार आहे. इटली हे दोघांचंही आवडतं पर्यटन स्थळ आहे त्यामुळे इथेच हे दोघंही विवाहगाठ बांधणार आहेत. त्यानंतर पुढच्या काही दिवसांत बॉलिवूड आणि इतर मंडळींसाठी मुंबईत ग्रँड रिसेप्शन असेल असंही म्हटलं जात आहे.