दीपिका पादुकोन आणि रणवीर सिंग यांचा आज (१५ नोव्हेंबर ) सिंधी पद्धीतीनं विवाहसोहळा संपन्न होणार आहे. हा विवाहसोहळा पूर्णपणे खासगी असेल याची काळजी दोघांनीही घेतली आहे. २४ तास उलटून गेले तरीही या दोघांच्या लग्नातले फोटो अद्यापही समोर आले नाहीत. आठड्याभरापासून या परिसरात कडेकोट सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे. पर्यटकांसह अनेकांना या परिसरातून दूर ठेवण्याचा प्रयत्न सुरक्षा सरक्षकांचा आहे. गेल्या तीन चार दिवसांपासून इटलीत सुरू असलेल्या या विवाहसोहळ्याच्या कडक सुरक्षाव्यवस्थेसाठी जोडप्यांनी कोट्यवधी रुपये खर्च केले आहेत.

सुत्रांच्या माहितीनुसार केवळ सुरक्षाव्यवस्थेसाठी या दोघांनीही तब्बल १ कोटींहून अधिक खर्च केला आहे. रणवीर दीपिकाच्या विवाहसोहळ्यासाठी व्हिला दी बाल्बिआनेलो पर्यटकांसाठी पूर्णपणे बंद करण्यात आला आहे. या परिसरात अन्य कोणीही येऊ नये यासाठी लेक कोमो परिसरात वसलेल्या या व्हिलाला बोटीनं गस्त घालण्यात येत आहे. लग्नाच्या समानाची ने- आण करणाऱ्या वाहनांव्यतिरिक्त अन्य कोणत्याही वाहनांना वाहतूकीसाठी इथे परवानगी देण्यात आली नाही असंही समजत आहे.

कार्यक्रमासाठी उपस्थित असलेल्या प्रत्येक पाहुण्याला खास रिस्ट ब्रँड देण्यात आले. तसेच प्रत्येकाला विशिष्ट कोड असलेला इ-पासही देण्यात आला होता. या सोहळ्यात बाहेरच्या कोणत्याही व्यक्तीनं प्रवेश करू नये यासाठी सुरक्षेच्या दृष्टीनं हा कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता. त्याचप्रमाणे पाहुण्यांनी मोबाइलमध्ये फोटो टिपून ते सोशल मीडियावर अपलोड करु नये म्हणून मोबाइलचा कॅमेरा झाकण्यासाठी त्यावर स्टिकर्स लावण्यात आल्याचंही समजत आहे. येथे ड्रोन वापरण्यास बंदी घालण्यात आली आहे. स्थानिक नाविकांना या परिसरात कोणत्याही व्यक्तीला न आणण्याची सूचना दिली आहे. जे पर्यटक पर्यटनासाठी नाव भाड्यानं घेतील त्यांचीही कसून चौकशी करण्यात यावी स्थानिक व्यतिरिक्त इतरांना नाव भाड्यानं देताना चौकशी करून मगच द्यावी अशाही सूचना केल्या असल्याचं समजत आहे.

हा सोहळा कोणत्याही विघ्नाशिवाय पार पाडावा यासाठी दीप-वीरनं इतकी मोठी रक्कम सुरक्षेवर खर्च केली आहे. इटलीत विवाहसोहळा पार पाडल्यानंतर दीपिका रणवीर लगेच मुंबईत परतणार आहे.