गेल्या वर्षभरापासून बॉलिवूडमध्ये कलाकारांच्या लग्नाची धामधूम पाहायला मिळत आहे. क्रिकेटपटू विराह कोहली आणि अनुष्का शर्मा यांनी लग्नगाठ बांधल्यानंतर अनेक कलाकार लग्नाच्या बेडीत अडकले. यांच्यानंतर आता बॉलिवूडचे बाजीराव – मस्तानी अर्थात दीपिका आणि रणवीर विवाहबंधनात अडकणार असून त्यांच्या लग्नाची तयारीही सुरु झाली आहे.

ऑनस्क्रीन केमिस्ट्रीबरोबर ऑफस्क्रीन केमिस्ट्रीमुळे चर्चेत राहणाऱ्या या जोडीने डेस्टिनेशन वेडिंगला प्राधान्य दिलं आहे. त्यामुळे या दोघांचं लग्न इटलीमध्ये होणार आहे. या लग्नासाठी दोघांच्याही घरातले सज्ज झाले असून त्यांनी खरेदीही सुरु केली आहे. सध्या लग्नामध्ये दीपिका कोणते दागिने घालणार यावर चर्चा सुरु असून तिने पारंपारिक दागिन्यांना प्राधान्य दिल्याचं पाहायला मिळत आहे.

लग्नामध्ये दीपिका रितीरिवाजानुसार पारंपारिक दागिने घालणार आहे. त्याबरोबरच तिने सिल्वर दागिनेही खरेदी केले आहेत. त्यामुळे लग्नातील सोहळ्यामध्ये दीपिका सिल्वर ज्वेलरीमध्ये दिसून येणार आहे. विशेष म्हणजे लग्नातील सोहळ्यामध्ये दीपिका जे कपडे परिधान करणार आहे त्या कपड्यांना साजेशा अशा दागिन्यांची खरेदी केल्याचं सांगण्यात येत आहे.

दरम्यान, लग्नासाठी जोमाने तयारी सुरु असलेल्या दीप-वीरचं लग्न ३० जणांच्या साक्षीने होणार आहे. यामध्ये त्यांचे जवळचे नातेवाईक आणि मित्र-मौत्रिणींचा समावेश आहे. इटलीत लग्न झाल्यानंतर दीपिका-रणवीरमुंबईमध्ये मोठं रिसेप्शनही करणार आहेत.