संजय लीला भन्साळी दिग्दर्शित पद्मावत सिनेमात महाराणी पद्मावतीची भूमिका साकारणाऱ्या दीपिका पदुकोणच्या घूमर डान्समध्ये मोठा बदल करण्यात आला आहे. रिपोट्सनुसार, गाण्यात ज्या ठिकाणी दीपिकाची कंबर दाखवण्यात आली आहे त्या सर्व ठिकाणी ग्राफिक्स करुन ती कपड्यांनी झाकण्यात येणार आहे. गाण्यात काही ठिकाणी दीपिकाने घातलेल्या घाघऱ्यामध्ये तिची कंबर दिसत आहे. यामुळे महाराणी पद्मावतीची प्रतिमा मलिन होते असा आरोप करण्यात आला आहे, यामुळे गाण्यात काही बदल करण्यास सांगण्यात आले होते.
‘द क्विंट’ने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार, सेन्सॉर बोर्डकडे जेव्हा हा सिनेमा पाठवण्यात आला तेव्हा बोर्डाने या गाण्यात आवश्यक ते बदल करण्यास सांगितले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सीबीएफसीच्या कमिटीने दीपिकाची कंबर ज्यात दिसते ते सर्व सीन हटवण्यास सांगितले. पण असे केले तर डान्सचे सगळेच स्टेप्स बदलतील आणि ते सिनेमा पाहताना खराब दिसेल म्हणून भन्साळी यांनी ग्राफिक्सचा वापर करण्याचा निर्णय घेतला.
सेन्सॉर बोर्डाने सुचवलेल्या बदलांनंतर निर्मात्यांनी अंतिम सिनेमा सेन्सॉर बोर्डाकडे सुपुर्त केला आहे. पण बोर्डाने अजूनही या सिनेमाला हिरवा कंदिल दाखवलेला नाही. बोर्डाचे अध्यक्ष प्रसून जोशी यांनी हा सिनेमा पाहिला. त्यांच्यासोबत काही इतिहासकारही तिथे उपस्थित होते. बोर्डाच्या सदस्यांना सिनेमात काहीच आक्षेपार्ह वाटले नाही. त्यांनी सिनेमात काही छोटेसे बदल सुचवले.
सुरूवातीला सिनेमात ३०० कट करण्यात आले असल्याचे समजले होते. कालांतराने प्रसुन जोशी यांनी ३०० कट नसल्याचे स्पष्ट केले. संपूर्ण पद्मावत सिनेमात फक्त ५ बदल करण्यात आले असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. दीपिका पदुकोण, रणवीर सिंग आणि शाहिद कपूर यांची मुख्य भूमिका असलेला हा सिनेमा २५ जानेवारीला प्रदर्शित होणार आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on January 13, 2018 6:50 pm