पडद्यावर साकारलेली प्रत्येक भूमिका ही त्या त्या कलाकाराच्या आयुष्यात थोडाफार का होईना आपला प्रभाव सोडते. अशा बराच भूमिका असतात, ज्या साकारल्यानंतरही कलाकारांच्या मनावर त्याचा खोलवर परिणाम जाणवत असतो. असंच काहीसं अभिनेत्री दीपिका पदुकोणसोबत झालंय. अॅसिड हल्ल्यातून बचावलेली लक्ष्मी अगरवालच्या आयुष्यावर आधारित ‘छपाक’ या चित्रपटात दीपिका लक्ष्मीची भूमिका साकारत आहे. या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला असून या ट्रेलर लाँच कार्यक्रमात दीपिका ढसाढसा रडली.

ट्रेलर लाँच झाल्यानंतर मंचावर दीपिकाला बोलावण्यात आलं. त्यावेळी दिग्दर्शिका मेघना गुलजार, अभिनेता विक्रांत मेस्सी आणि निर्माते मंचावर उभे होते. जेव्हा दीपिकाला ट्रेलरविषयी बोलण्यात सांगण्यात आले तेव्हा तिला रडू कोसळलं. संपूर्ण शूटिंग झाल्यानंतर पडद्यावर ट्रेलरच्या स्वरुपात कथेची झलक पाहिल्याने ती भावूक झाली, असं मेघना यांनी त्यावेळी म्हटलं. सहकलाकार विक्रांतनेही दीपिकाला सावरण्याचा प्रयत्न केला.

काही वेळानंतर आवंढा गिळून दीपिका म्हणाली, “काही चित्रपट स्वीकारताना त्याची संपूर्ण कथा आम्ही वाचतो, समजून घेतो. पण मेघना जेव्हा माझ्याकडे छपाकची कथा घेऊन आली, तेव्हा त्याची पहिली एक-दोन पानं वाचून मी लगेच होकार दिला. हा कथा मला पडद्यावर साकारायची होती आणि त्यात मेघना गुलजारचं मोठं श्रेय आहे. ”

‘छपाक’मधील लक्ष्मीची भूमिका साकारतानाच आलेला अनुभव मी आधी कधीच अनुभवला नसल्याचं दीपिकाने सांगितलं. १० जानेवारी २०२० मध्ये हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.